‘फातिमा’च्या जखमांवर सीपीआरची फुंकर
By admin | Published: February 13, 2017 12:39 AM2017-02-13T00:39:28+5:302017-02-13T00:39:28+5:30
त्वचारोपण : फटाक्यांच्या आगीमुळे ३० टक्के जखमी होती फातिमा; कुपोषणावरदेखील मात
कोल्हापूर : शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील आधार विद्यालय या निवासी शाळेतील पाच वर्षांच्या ‘फातिमा’ या गतिमंद मुलीच्या भाजलेल्या त्वचेवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने (सीपीआर) त्वचारोपणाची शस्त्रक्रिया केली.
रामानंद म्हणाले, शित्तूर तर्फ मलकापूर येथील आधार विद्यालय या निवासी शाळेतील ३७ कुपोषित व गतिमंद मुले सीपीआर रुग्णालयात आॅक्टोबर २०१६ मध्ये ठेवली होती. याच गतिमंद शाळेतील पाच वर्षांची ‘फातिमा’ ही फटाक्यांच्या ज्वालांमुळे ३० टक्के भाजली होती. तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते, पण खासगी रुग्णालयाचा खर्च संस्थेस परवडत नसल्याने तिला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. ती गतिमंद तसेच कुपोषित होती.
तिच्या जखमांमध्ये जंतुसंसर्ग झाला होता. जखमा स्वच्छ करणे, सलाईन व इंजेक्शन देणे तसेच तिची वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, हे आव्हान होते.
फातिमाला होणाऱ्या वेदना पाहून सीपीआर दवाखान्यातील सर्वांचे हृदय हेलावून जायचे. त्यानंतर काही दिवसांतच तिच्या जखमा स्वच्छ होऊ लागल्या. तिला रुग्णालयामार्फत पोषण आहार दिल्यामुळे तिचे कुपोषणही कमी झाले. भाजलेल्या जखमा खोलवर असल्याने तिच्यावर त्वचारोपणाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासाठी तिला भूल देणे व त्यामधील धोका समजावून सांगणे आणि नंतर स्वच्छता राखणे हे आव्हान होते. याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सांगण्यात आली. तिच्या सेवेसाठी जिल्हा परिषद व बालकल्याण संकुल यांच्यातर्फे २४ तास कर्मचारी नेमले. या पूर्वतयारीनंतर त्वचारोपणाची शस्त्रक्रिया केली. या शस्रक्रियेनंतर फातिमाच्या वेदना कमी झाल्या असून त्वचा पूर्ववत होत आहे.
पत्रकार परिषदेस प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. वसंतराव देशमुख, सुनील करंबे, अजित गायकवाड उपस्थित होते.
वैद्यकीय पथकाचे
मोलाचे सहकार्य
त्वचारोपणाची शस्त्रक्रियेसाठी बालरोग शल्यचिकित्सक डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, डॉ. हरीश पाटील, सहायक प्रा. डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. आकाश तर्कसे, डॉ. संदीप काळे तसेच भूलशास्त्र विभागातील उल्हास मिसाळ, डॉ. मारुती पवार, डॉ. राऊत, यांच्यासह पारिचारिकांनीही परिश्रम घेतले.
साताऱ्यातील
शासकीय संस्थेत
साताऱ्यातील ‘स्नेह निकेतन एकात्मिक बाल विकास’ या शासकीय संस्थेत तिला आता दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.