सीपीआरमध्ये अखेर साेमवारपासून बाह्यरुग्ण विभाग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:01+5:302021-09-24T04:29:01+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे बंद करण्यात आलेला सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभाग आता सोमवार, दि. ...
कोल्हापूर : कोरोनामुळे बंद करण्यात आलेला सीपीआरमधील बाह्यरुग्ण विभाग आता सोमवार, दि. २७ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. तात्पुरता कार्यभार असलेल्या अधिष्ठाता डॉ. अनिता सैबन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे सीपीआरमधील बाहय् रुग्ण विभाग बंद करून ही सेवा कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामध्ये देण्यात येत होती. ज्यावेळी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावार वाढले तेव्हा सेवा रुग्णालयावरही मोठा ताण पडला. गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्याने सीपीआरमध्ये नियमित रुग्ण तपासणी आणि उपचार सुरू करण्याबाबत मागणी होत होती. तसेच शस्त्रक्रियाही बंद असल्याने अनेक रुग्ण सीपीआर विनाकोरोना रुग्णांसाठी सुरू होण्याची वाट पाहात होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही बाहयरुग्ण विभाग सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
याआधी गेल्या महिन्यात तत्कालीन अधिष्ठाता यांनी असा विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर पूर्ण क्षमतेने कधीच हा विभाग सुरू झाला नाही. याबाबत ठोस धोरण आखले नसल्याने लवकरात लवकर हा विभाग सुरू करण्याची मागणी होत होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते.
त्यानुसार तात्पुरता कार्यभार असलेल्या डॉ. अनिता सैबन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. यामध्ये सोमवार, दि. २७ सप्टेंबरपासून बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आवश्यक सर्व ती तयारी करण्याच्याही सूचना सर्व उपस्थित विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
चौकट
बैठकीत झालेले निर्णय
१ कोविड १९ करिता वापरण्यात आलेले सर्व जागेचे निर्जंतुकीकरण करणे.
२ पुरेसा औषधसाठा आणि औषध निर्माते उपलब्ध करून नियोजन करणे
३ कोविड १९ वॉर्डात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त विभागात उपलब्ध असलेले उर्वरित मनुष्यबळ उपयोगात आणून नॉनकोविड सेवा सुरू ठेवाव्यात.
४ सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग सुरू होत असल्याने रक्त नमुना चाचण्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत सुरू ठेवाव्यात.
५ बाह्यरुग्ण विभाग सुरू करताना कोविडविषयक सर्व काळजी घेण्यात यावी.