सीपीआर रुग्णालय : दीड वर्षात पावणेचार हजारावर नेत्रशस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:53 AM2019-08-27T10:53:51+5:302019-08-27T10:57:43+5:30
तानाजी पोवार कोल्हापूर : ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या म्हणीप्रमाणे दृष्टीचे महत्त्व आहे. गेल्या वर्षभरात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हे ...
तानाजी पोवार
कोल्हापूर : ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या म्हणीप्रमाणे दृष्टीचे महत्त्व आहे. गेल्या वर्षभरात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविण्यास सुरू केल्यापासून राज्यभर मोतीबिंदू शस्त्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात गेल्या दीड वर्षांत सुमारे ३७६१ रुग्णांवर मोतिबिंदंूसह इतर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर ५८ जणांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया केल्याने त्यांना दृष्टी मिळाली.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह सीमाभागातील रुग्णांचा भार सीपीआर रुग्णालयावर आहे. विविध रुग्णांवरील उपचारासह येथील नेत्र विभागाचे कामही कौतुकास्पद आहे. सीपीआर रुग्णालयात दरमहा सुमारे ३०० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात.
डोळ्याला मोतिबिंदू झालेला रुग्णाची तपासणी केल्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत त्या रुग्णावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. राष्टÑीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दरवर्षी औषध, उपकरणासाठी ठरावीक निधी प्राप्त होतो, त्या निधीतून या मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात.
सीपीआर रुग्णालयात नेत्रतपासणी विभाग हा नेहमीच कार्यरत आहे. गेल्या वर्षी शासनाच्या वतीने मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात आले, त्यानंतर मोतिबिंदू शस्त्रक्रियेच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.
सीपीआर रुग्णालयात गेल्या वर्षभरात सुमारे २८३४ नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यामध्ये बहुतांशी मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा समावेश आहे, तर याच कालावधीत मृत्युपश्चात सुमारे ४२ नेत्रदान मिळाले, तर त्यांचे ४० रुग्णांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
नेत्रशस्त्रक्रियेसाठी राष्टÑीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून निधी मिळत असल्याने या शस्त्रक्रिया करण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत; पण रुग्णांची तपासणीअंती त्यांना पुढील चार दिवसांची वेळ देऊन या शस्त्रक्रिया महात्मा फुले जीवनदायी योजनेतून मोफत केल्या जातात.
वर्षे नेत्रशस्त्रक्रिया नेत्रदान नेत्ररोपण
२०१७-१८ १८१० ---- ----
२०१८-१९ २८३४ ४२ ४०
एप्रिल ते जुलै २०१९ ९२७ १९ १८
जनजागृतीसाठी प्रयत्न हवेत
नेत्रदानाचे महत्त्व मोठे आहे, मृत व्यक्तीच्या डोळ्यांतून दोन अंधांना दृष्टी मिळून ते जग पाहू शकतात; त्यामुळे या नेत्रदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाच्या वतीने नेत्रदानाबाबत समाजात जनजागृतीसाठी आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनीही मानसिकता बदलून नेत्रदानाचे महत्त्व समजून घेण्याची आवश्यकता आहे.
नेत्रदानाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे; पण त्यासाठी मानसिकता अद्याप तयार झालेली नाही, शासनाच्या वतीने नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम घेतले जातात; पण नेत्रदान हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास बालमनापासूनच त्याची जागृती होण्यास मदत होईल.
- डॉ. अतुल राऊत,
नेत्रविभागप्रमुख, सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर.