पैसे द्या, फाइल नंबर सांगा, काम होईल: कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांत पाडला जातो ढपला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:34 PM2023-03-11T17:34:32+5:302023-03-11T17:34:59+5:30
भक्त भेटेल तशी दक्षिणा..
दीपक जाधव
कोल्हापूर : जिल्हा रुग्णालयातील स्थायित्व प्रमाणपत्रांसाठी सीपीआरमधील परिचारिकेकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना वरिष्ठ लिपिक पकडला गेल्यानंतर नेमणूक ग्रामीण रुग्णालयात पण काम सीपीआरमध्ये करणाऱ्याची चौकशी होणार का, अशी विचारणा होत आहे. याठिकाणी असणारी साखळी कोण तोडणार, असा प्रश्न शासकीय कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. ‘फक्त पैसे द्या व नाव आणि फाइल नंबर सांगा, काम होऊन जाईल’ अशी साखळी तिथे घट्ट झाल्याची चर्चा आहे.
जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक हुसेनबाशा शेख याला लाचलुचपतने अटक केली. शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले त्याचबरोबर वैद्यकीय रजा, नोकरीसाठी अवश्यक फिटनेस प्रमाणपत्रासाठी कर्मचाऱ्यांना सीपीआरमध्ये यावे लागते. वैद्यकीय बिलाची फाइल ही दारावरील पहिलवान लिहून परस्पर सही घेतो.
एका ग्रामीण रुग्णालयातील शिपाई सर्वांचा लाडका 'मंत्री' रोज अशा कर्मचाऱ्यांकडून फायली गोळा करून सीपीआरमध्ये आणून देतो. लिपिक कोणत्याही फाइल करत नाही. ही साखळीच करते. बाहेरच्या बाहेर सफाई कर्मचारी व दारावरील पहिलवान फायली लिहितो. यासाठी स्वतंत्र लिपिक नाही. फक्त कागदोपत्री शेख याच्याकडे टेबल होते.
शल्यचिकित्सकाच्या केबिनबाहेर रोजंदारीवरील दिलीप हा सफाई कर्मचारी नेमला असून, शल्यचिकित्सकांना भेटण्यासाठी वर्ग एकच्या डाॅक्टरांनादेखील त्याची परवानगी घ्यावी लागते. बिलाच्या फायलीचे आदेश हा दारावरील पहिलवानच करतो. त्याला डीएमआरचा दिलीप मदत करत असून, चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेला चलाख 'खोपडी'चा शिपाई अजूनही बिलाच्या फायली गोळा करून सीपीआरमध्ये रोज येतो.
खुपिरेचा मंत्री हा नेमणूक ग्रामीण रुग्णालयात असून दिवसभर वैद्यकीय बिलाची सुपारी घेऊन सीपीआरमध्येच असतो. त्याच बरोबर पदोन्नती होऊनही जिल्हा न सोडलेला मनोजही तासन्तास सीपीआरमध्ये असतो. एका लिपिकाची बदली आरोग्य उपसंचालक कार्यालयात झाली असून त्याने वरिष्ठांकडे 'उत्तम' प्रयत्न करून आठवड्यातील दोन दिवस आपली प्रतिनियुक्ती वैद्यकीय बिलाच्या फाइलसाठी सीपीआरमध्ये करून घेतली.
चहापेक्षा किटली गरम..
जिल्हा रुग्णालयात सध्या शासकीय कर्मचारी संख्या कमी असून शासनाने रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर केली असून, याच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा रुबाब जास्त आहे.
भक्त भेटेल तशी दक्षिणा..
तीन लाखांपर्यंतची बिले ही जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अधिकारात येत असून, बिलाच्या फाइलवर मंजूर आदेश झाला की त्याची फी म्हणून शासनाला दोन टक्के फी भरून रीतसर पावती घेतली जाते. मात्र, दारावरील पहिलवान हा समोरच्या कर्मचाऱ्याने हे कितपत खरे केले आहे ते बरोबर ओळखतो आणि मग तो दोन टक्क्यांपासून ते दहा टक्क्यांपर्यंत दक्षिणा घेतो.