कॅन्सर ग्रिडमध्ये ‘सीपीआर’चा समावेश

By admin | Published: May 9, 2017 06:19 PM2017-05-09T18:19:04+5:302017-05-09T18:19:04+5:30

रुग्णांना मिळणार अत्याधुनिक सुविधा : टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर देणार प्रशिक्षण

The CPR is included in the cancer grid | कॅन्सर ग्रिडमध्ये ‘सीपीआर’चा समावेश

कॅन्सर ग्रिडमध्ये ‘सीपीआर’चा समावेश

Next

आॅनलाईन लोकमत/गणेश शिंदे

कोल्हापूर, दि. ९ : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा (सीपीआर) नॅशनल क ॅन्सर ग्रिडममध्ये समावेश झाला आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. याकरिता ‘सीपीआर’मधील विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना मुंबईच्या टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरमध्ये प्रशिक्षण अथवा टाटा मेमोरियलचे तज्ज्ञ या ठिकाणी येऊन प्रशिक्षण देणार आहेत.

राज्यात १६ वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मुंबई येथील टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरमध्ये दिवसेंदिवस कॅन्सररुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद या ठिकाणी नॅशनल क ॅन्सर ग्रिड आहे. आशिया खंडातील कॅन्सररुग्णांसाठी वरदान असलेले टाटा मेमोरियल रिसर्च सेंटर हे एकमेव रुग्णालय आहे. या सेंटरमध्ये कॅन्सररुग्णांचे ५२५ बेड आहेत. येथे देशभरातून सर्वाधिक कॅन्सररुग्ण येतात. त्यामुळे येथील मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेऊन सीपीआर रुग्णालयाचा नॅशनल कॅन्सर ग्रिडमध्ये समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सध्या ‘सीपीआर’मध्ये रोज सरासरी २५, तर वर्षाला सुमारे ३०० कॅन्सररुग्णांवर शस्त्रक्रिया होतात. आॅपरेशन करून गाठ काढणे, औषध (केमोथेरपी), किरणोत्सर्गाद्वारे उपचार करणे असे विविध प्रकारचे उपचार आहेत. कॅन्सरमधील विविध पेशींसाठी लिनोअर अ‍ॅक्सिलरेटर ही यंत्रसामग्री बसविण्यात येणार आहे. या यंत्रसामग्रीची सुमारे १५ कोटी रुपये किंमत आहे; तर बंकरसाठी पाच कोटी रुपये लागणार आहेत.

कोल्हापूरसह कोकणातील रुग्णांची गरज ओळखून ‘सीपीआर’मधील अभ्यागत समितीने ‘कॅन्सर ग्रिड’साठी प्रयत्न सुरू केले होते, त्याला यश आले आहे.

काय आहे कॅन्सर ग्रिड ?

राज्यात औरंगाबाद, नागपूर व पुणे या ठिकाणी कॅन्सर ग्रिड सुरू करण्यात आले आहे. आता त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश झाला आहे. कॅन्सर ग्रिडमध्ये कुशल वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाते.

आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण

मुंबईच्या टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरमध्ये कॅन्सररुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर वेळेत उपचार होऊ शकत नाहीत. रुग्णांना वेळेत उपचार होण्यासाठी राज्य शासनाने कोल्हापूरचा क ॅन्सर ग्रिडमध्ये समावेश केल्याने भविष्यात राज्यातील आणखी मोठ्या शहरांचा कॅन्सर ग्रिडमध्ये समावेश करून आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण करण्यावर राज्य शासनाचा भर राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रसह कोकणातील रुग्णांना लाभ

‘सीपीआर’मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह सीमाभागातील कॅन्सररुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागातील कॅन्सररुग्णांचे मुंबई व पुण्याला जाण्यासाठी हेलपाटे वाचणार आहेत. कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

२०,२१ ला मुंबईत बैठक

कॅन्सर ग्रिडबाबत परेल येथील टाटा मेमोरियल रिसर्च सेंटरमध्ये २० व २१ मे २०१७ रोजी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी देशभरातून तज्ज्ञ येणार असून उपस्थितांना तेथील नामवंत वैद्यकीय अधिकारी कॅन्सर ग्रिडविषयीचे मार्गदर्शन करणार आहेत.

हा होणार फायदा...

लवकर निदान आणि प्रभावी उपचारांमुळे रुग्णाचा जीव वाचणार.

मुंबई, पुण्याचे हेलपाटे वाचणार. 

खासगी रुग्णालयापेक्षा रुग्णांना माफक दरात मिळणार सेवा.

 नॅशनल कॅन्सर ग्रिडमध्ये समावेश होण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले. यामुळे अत्याधुनिक पद्धतीचे उपचार गरीब रुग्णांना मिळण्यास मदत होणार आहे.

- डॉ. जयप्रकाश रामानंद,

अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.

Web Title: The CPR is included in the cancer grid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.