‘सीपीआर’मध्ये लाखोंचा ढपला; महात्मा फुले योजनेत पाच वर्षांत लाखो रुपयांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:29 AM2020-02-01T11:29:20+5:302020-02-01T11:33:20+5:30
यापूर्वी या योजनेचे बोगस लाभार्थी दाखवून अनेक रुग्णालयांनी परस्पर पैसे उचलल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता तर गरिबांचे रुग्णालय मानल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयातच लाभार्थ्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तानाजी पोवार
कोल्हापूर : शासकीय योजना मंजूर होऊनही त्यांचा रुग्णांना लाभ न देता त्या पैशांवर परस्पर डल्ला मारणारे रॅकेट येथील राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) कार्यरत असल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. महात्मा फुले जीवनदायी योजनेतून गेल्या पाच वर्षांत अशा लाखो रुपयांचा अपहार झाल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. या योजनेतून मोफत भोजन, पहिल्या डायलेसिससह डिस्चार्जनंतर घरापर्यंत जाण्यासाठी देण्यात येणारे बसभाडे यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना व्हावा, या हेतूने संपूर्ण राज्यभर गेल्या सहा वर्षांपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेचे बोगस लाभार्थी दाखवून अनेक रुग्णालयांनी परस्पर पैसे उचलल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता तर गरिबांचे रुग्णालय मानल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयातच लाभार्थ्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महात्मा फुले जीवनदायी योजनेतील लाभार्थी रुग्णांवर मोफत उपचारांसह दोनवेळचे जेवण मोफत दिले जाते. योजना लागू असणाºया खासगीसह सर्व शासकीय रुग्णालयांतही हे लाभ देणे बंधनकारक आहे; पण ‘सीपीआर’ रुग्णालयात गेल्या पाच वर्षांत दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रुग्णांना याचा लाभ दिला आहे. त्याशिवाय केशरी रेशनकार्डधारक लाभार्थीला वंचित ठेवले आहे. दोनवेळचे भोजन देण्याची जबाबदारी ‘सेंट्रल किचन’कडे दिली आहे. बीपीएल कार्डधारक वगळता इतर लाभार्थ्यांच्या नावे हे भोजनाचे पैसेही खर्च पडल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी संबंधित रुग्णाला भोजन न देताच हे पैसे परस्पर हडप केल्याचे उघडकीस आले आहे.
‘
डायलेसिस’चे पैसे डॉक्टरांच्या खिशात!
सीपीआर रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण महात्मा फुले जीवनदायी योजनेत बसत असल्याने ‘ईटीआय’अंतर्गत पहिले डायलेसिस मोफत करणे बंधनकारक आहे. डायलेसिस झाल्यानंतर ७२ तासांत त्या रुग्णाच्या नातेवाइकांनी केशरी रेशनकार्ड व आधारकार्ड जमा करावे लागते; पण गेल्या पाच वर्षांत रुग्ण दाखल झाल्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याकडून पहिल्याच डायलेसिससाठी ३२०० ते ३५०० रुपये भरून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे; पण याही लाखो रुपयांचा काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांंनी परस्पर अपहार केल्याचेही निदर्शनास आले आहे.
रुग्ण घरपरतीचेही पैसेही हडप
महात्मा फुले जीवनदायी योजनेतील लाभार्थी रुग्णाला डिस्चार्जनंतर घरापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बसभाडे दिले जाते. गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने किमान पाच ते सहा हजार रुग्ण या योजनेचा लाभ घेऊन घरी पोहोचले; पण त्यांना हे पैसे कधीही देण्यात आलेले नाहीत; पण रुग्णांच्या नावावर हे पैसे खर्ची पडल्याचे दिसून आले आहे. मग हे पैसे गेले कोठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी किमान १००० रुग्ण
सीपीआर रुग्णालयात जीवनदायी योजनेतून किमान १००० हून अधिक रुग्ण उपचार घेऊन घरी परततात; पण या रुग्णांना मोफत भोजन मिळालेले नाही, डायलेसिसच्या रुग्णांकडून पहिल्या डायलेसिससाठी पैशांची उचल झाली आहे; तर बहुतांश सर्वच रुग्णांना घरपरतीचे बसभाडे दिलेले नाही. गेल्या पाच वर्षांत गुपचूपपणे हे पैसे खर्च टाकून संगनमताने अपहार केल्याचे दिसून येते.
फोटो काढून पैसे दिल्याचा बनाव
रुग्णालयात रुग्ण डिस्चार्ज घेतल्यानंतर त्याच्यासमोर फॉर्म भरून त्याला १० रुपयांची नोट लावून फोटो काढला जात असल्याची कबुली आरोग्यमित्रांनी दिली आहे. बहुतांश वेळी १० रुपयांचीच नोट लावून फोटो काढून ते शासनाच्या योजनेत खर्ची पडल्याचे दाखविण्यात आले आहे; पण हे पैसे रुग्णाला कधीही दिले नाहीत. फक्त देखावा केला जात असल्याचे योजनेच्या आरोग्यमित्रांनी शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासमोर कबूल केले.
अधिष्ठात्यांनी केली झाडाझडती
हा संगनमताने अपहार चालल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शुक्रवारी सायंकाळी तातडीने गोपनीय बैठक घेऊन अनेक कर्मचारी, समन्वयकांची कानउघाडणी केली. त्यामध्ये हा घोटाळा बाहेर आला. त्यामुळे यापूर्वीच्या अधिष्ठात्यांनी डोळेझाक केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
योजनेतील सर्व लाभ ‘सीपीआर’मधील रुग्णांना दिले जात नसल्याचे दिसून आले. पैसे खर्च पडल्याचेही समजते. तरीही हे पैसे कोठे गेले याची चौकशी करण्याचे काम सुरू आहे - डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जीवनदायी योजना.
जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांना मोफत भोजन, मोफत डायलेसिस व घरपरतीचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार समन्वयकांची बैठक घेऊन चौकशी केली आहे. त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चौकशीही सुरू आहे; पण येथून पुढे सर्व लाभ रुग्णांना दिले जातील.
- डॉ. मीनाक्षी गणभिये, अधिष्ठाता, रा. शा. शा. वैद्यकीय महाविद्यालय.