‘सीपीआर’मुळे वाचला कोडोलीच्या तरुणाचा जीव
By admin | Published: May 12, 2017 01:17 AM2017-05-12T01:17:20+5:302017-05-12T01:17:20+5:30
डॉक्टरांचे अथक प्रयत्न : मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर; अवघ्या चार-पाच दिवसांतच रुग्ण पूर्ण बरा
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : मधुमेह, रक्तदाब या आजारांनी कोम्यात गेलेल्या तरुण रुग्णावर उपचार करताना खासगी रुग्णालयातील डॉक्टरही हतबल झाले; पण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालया (सीपीआर) मधील डॉक्टरांनी सलग चार दिवस उपचार करून त्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अवघ्या चार-पाच दिवसांच्या उपचारांनंतर गुरुवारी तो रुग्ण पूर्ण बरा होऊन ‘डिस्चार्ज’ घेऊन चालत घरी गेला. पुण्यातील खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा व मूळचा कोडोली (ता. पन्हाळा) येथील शिरीष शिवाजी चोपडे (वय ३०) असे या रुग्णाचे नाव होय.
कोडोली येथे हौदात अंघोळ केल्यानंतर शिरीषला ताप आला, प्रकृतीही बिघडली. गावातीलच खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केले; पण धाप वाढली, शुद्धही हरपली. त्यामुळे त्याला दि. २५ एप्रिलला नातेवाइकांनी कोल्हापुरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तो पूर्णपणे कोम्यात होता. डॉक्टरांनी औषधोपचार केले, बिलही अवाढव्य केले; पण तो कोम्यातच राहिला. हतबल डॉक्टरांनी, ‘काही उपयोग होणार नाही’ हे नेहमीचे उत्तर देत घरी नेण्यास सांगितले. त्यामुळे शिरीष मृत्यूची अंतिम घटका मोजत असतानाच काहींनी कोल्हापुरात सीपीआरमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाइकांनी विश्वासाने शिरीषला चार दिवसांपूर्वी रात्री उशिरा उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले. शुद्ध हरपलेल्या अवस्थेतही तो कसाबसा श्वास घेत होता. त्याच्या रक्ताच्या चाचण्या घेतल्या. त्याला डेंग्यूसदृश रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आली. मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने शरीरात ‘किटो अॅसिड’ निर्माण झाले होते. दोन्हीही किडन्या निकामी होण्याच्या अवस्थेत होत्या. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटर लावले. कमी झालेल्या रक्तदाबाच्या परिस्थितीतही त्याच्यावर दोन वेळा डायलेसिस केले. तीन दिवस बेशुद्ध अवस्थेतील शिरीषचे सर्व अवयव बंद पडलेल्या स्थितीत होते.
‘सीपीआर’मधील डॉक्टरांच्या पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर तीन दिवसांनी शिरीषने औषधाला प्रतिसाद दिला. चौथ्या दिवशी तो चक्क उठून बसल्याने सर्वांच्या जिवात जीव आला. ‘सीपीआर’मधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी शिरीषला चक्क मृत्यूच्या दाढेतून परत आणले होते. गुरुवारी ठीकठाक झालेल्या शिरीषला रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ दिला. त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टराचे आभार मानले.
अथक प्रयत्न करणारे डॉक्टरांचे पथक
या रुग्णासाठी सीपीआरमधील
डॉ. एम. व्ही. बनसोडे, डॉ. दर्शन, डॉ. स्नेहा, अतिदक्षता विभागातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, औषधतज्ज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे, विभागप्रमुख डॉ. आर. टी. बोरसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.