'सीपीआर' बचाव कृती समितीची निदर्शने
By admin | Published: November 18, 2014 10:55 PM2014-11-18T22:55:59+5:302014-11-18T23:31:42+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : दोन दिवसांत बैठक घेण्याचे विक्रांत चव्हाण यांचे आश्वासन
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या(सीपीआर) विविध समस्यांप्रश्नी पुढील दोन दिवसांत बैठक घेऊ,असे आश्वासन आज, मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी निदर्शने केली.
सीपीआरमध्ये औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता व गैरहजेरी, मेडिकल व डायग्नोस्टिक इन्स्ट्रुमेंटस यांची कमतरता तसेच रुग्णालयातील अनेक उपकरणे आजही बंद अवस्थेत आहेत. जीवनरक्षक लसींचा तुटवडा आहे,असे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर १ एप्रिल २०११ पासून सीपीआर हे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेले आहे. त्यामुळे हे रुग्णालय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे हस्तांतरित झाले आहे. पूर्वीप्रमाणेच सीपीआरला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा. जिल्हा नियोजन मंडळाच्या समितीमध्ये (डीपीडीसी) सीपीआरसाठी नवीन हेड निर्माण करणे आदी मागण्या केल्या आहेत.
सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या निदर्शनानंतर समितीचे निमंत्रक वसंत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांना शिष्टमंडळ भेटले. यावेळी मुळीक यांनी, यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी सीपीआरप्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची संयुक्त बैठक घेण्याचे सांगितले होते. पण, त्यांनी घेतली नाही, असे सांगितले.
निदर्शनात बाळासाहेब भोसले, बबन रानगे, संभाजी जगदाळे, बाबा इंदूलकर, दिलीप पवार, दिलीप देसाई, उमेश पोर्लेकर, सुभाष देसाई, किशोर घाटगे, नीलेश लाड, महादेव जाधव, मनोज नरके, अक्षय कांबळे, अजित सासने, आप्पासाो मिसाळ, शिरीष देशपांडे, रघुनाथ कांबळे, डॉ. संदीप पाटील, चंद्रकांत चव्हाण, रूपेश इंगवले, कुमार काटकर, अवधूत पाटील, पद्माकर कापसे, भाऊसाो काळे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात मंगळवारी सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याशी वसंत मुळीक यांनी चर्चा केली. शेजारी बबन रानगे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, आदी.
जिल्हाधिकारी यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास सीपीआरप्रश्नी विविध मार्गांनी आंदोलन करू
- वसंत मुळीक, निमंत्रक सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समिती, कोल्हापूर.