सीपीआर फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:30+5:302021-04-07T04:26:30+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील सीपीआर रुग्णालय पुन्हा केवळ कोरोना रुग्णांसाठी सज्ज करण्याच्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील सीपीआर रुग्णालय पुन्हा केवळ कोरोना रुग्णांसाठी सज्ज करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना मंगळवारी पत्र पाठवून तशा सूचना दिल्या.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यांच्यासाठी बेड उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे सीपीआरमध्ये येणाऱ्या बाह्यरुग्णांना कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामध्ये तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ५० टक्के आंतर रुग्ण सेवा इतर खाजगी रुग्णालयातून सुरू राहतील याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी विभागवार संपर्क अधिकारी नेमून नियोजन करावे, असे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांना पाठवण्यात आले आहे.
गतवर्षी ही सीपीआरमधील सर्व अन्य रुग्णांना सेवा रुग्णालयातून सेवा देण्यात येत होती आणि सीपीआर हे पूर्णपणे जिल्हा कोविड समर्पित रुग्णालय घोषित करण्यात आले होते. याचाच पहिला टप्पा म्हणून यादृष्टीने आता तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या येथील ५० टक्के आंतररुग्ण सेवा अन्य रुग्णालयांमध्ये हलवण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, जर कोरोना रुग्ण वाढीचा वेग असाच वाढत राहिला, तर मात्र येथील सर्व अन्य सेवा बंद करण्यात येणार आहेत.
चौकट
सीपीआरमध्ये वॉर रूम
जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्रानुसार एकीकडे कार्यवाही करणे सुरू असताना दुसरीकडे सीपीआरमध्ये याबाबत वॉर रूम तयार करण्यात आली आहे. कोविडबाधित गंभीर, अतिगंभीर रुग्ण, त्यांच्यासाठी ऑक्सिजन बेडची सुविधा, व्हेंटिलेटर्स तसेच रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती एकत्रित करून तेथे समाजसेवा अधीक्षक यांची ड्यूटी लावण्यात येणार आहे. ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठीची ही तयारी करण्याच्या सूचना अधीक्षक डॉ. विजय बरगे यांनी दिल्या आहेत.