‘सीपीआर’चा अपघात विभाग होणार सुसज्ज, दहा दिवसांत स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:49 PM2019-08-26T13:49:30+5:302019-08-26T13:53:03+5:30

सर्वसामान्यांचा आधारवड ठरणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभाग आणखी सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग स्थलांतरित होत आहे. नवीन सुसज्ज विभागामध्ये रुग्णांसाठी ३० बेड, डॉक्टर व नर्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.

CPR 's accident department will be migrating, processing in ten days | ‘सीपीआर’चा अपघात विभाग होणार सुसज्ज, दहा दिवसांत स्थलांतरित

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील अपघात विभाग सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुुरू झाली आहे. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सीपीआर’चा अपघात विभाग होणार सुसज्ज, दहा दिवसांत स्थलांतरितमुख्य प्रवेशद्वारनजीक इमारतीचे काम सुरू

कोल्हापूर : सर्वसामान्यांचा आधारवड ठरणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभाग आणखी सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग स्थलांतरित होत आहे. नवीन सुसज्ज विभागामध्ये रुग्णांसाठी ३० बेड, डॉक्टर व नर्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सीमाभागातील अनेक रुग्णांचा ओघ ‘सीपीआर’कडे मोठ्या प्रमाणात आहे. अपघातग्रस्त रुग्णांसह तातडीच्या उपचारासाठी सर्वच रुग्णांसाठी ‘सीपीआर’मधील अपघात विभाग २४ तास सज्ज असतो. त्यामुळे येथे रुग्णांवर तातडीने उपचार केले जातात. अनेक रुग्णांना नवसंजीवनी देणारा विभाग म्हणून याला संबोधले जाते.

दिवसभर या अपघात विभागात रुग्णांचा ओघ सुरूच असतो. त्यामुळे येथे गर्दी ही नित्याचीच बाब बनली आहे. रुग्णांचा दैनंदिन वाढता ओघ आणि या विभागाची अपुरी जागा यांमुळे डॉक्टरांना रुग्णांवर तातडीचे उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याचा विचार करता हा विभाग आणखी सुसज्ज करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी सीपीआर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या दगडी इमारतीत हा अपघात विभाग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने हा विभाग स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग पूर्णपणे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात येत आहे.

सध्याच्या अपघात विभागात तातडीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी १५ बेड असून नवीन सुसज्ज विभागात ३० बेड, अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र प्रसूती कक्ष, डॉक्टर आणि नर्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष असतील.

फिजिओथेरपी जुन्या इमारतीत

स्थलांतरित करण्यात येणाऱ्या इमारतीत सध्या फिजिओथेरपी विभागासह ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ या विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये सध्याच्या अपघात विभागाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

सराफ संघाचे योगदान

सध्याचा अपघात विभाग सुरू करण्यासाठी १९८५ मध्ये कोल्हापूर सराफ संघाने ‘सीपीआर’ला सुमारे एक लाख ८५ हजार रुपये निधी दिला होता, त्यातून तो विभाग सुरू करण्यात आला होता.

रुग्ण व नातेवाइकांची गर्दी आणि अपुऱ्या जागेमुळे रुग्णसेवा देताना अडचणी निर्माण होत होत्या. आता नवीन, प्रशस्त जागेत हा विभाग स्थलांतरित केल्यावर तेथे सुसज्ज रुग्णसेवा देता येतील.
- डॉ. अजित लोकरे,
अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.

 

 

Web Title: CPR 's accident department will be migrating, processing in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.