सीपीआर सर्वच रुग्णांसाठी झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:27+5:302021-08-19T04:29:27+5:30
कोल्हापूर : गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांसाठी बंद असलेले सीपीआर रुग्णालय बुधवारपासून खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी १५ ...
कोल्हापूर : गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांसाठी बंद असलेले सीपीआर रुग्णालय बुधवारपासून खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी १५ हून अधिक अन्य आजारांच्या रुग्णांनी सीपीआरच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. १५ ऑगस्टला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लवकरात लवकर सीपीआरमध्ये अन्य रुग्णांची सोय करण्याची सूचना केली होती.
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे संख्या वाढण्याच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सीपीआर हे केवळ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांना सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, तसेच अनेकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येऊ लागल्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी सीपीआर लवकरात लवकर अन्य रुग्णांसाठी खुले करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बुधवारपासून कार्यवाही करण्यात आली. सीपीआरमधील २५० बेड कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहेत, तर शस्त्रक्रिया करण्यासाठीही दोन ऑपरेशन थिएटर्सही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या सीपीआरमधील वेदगंगा इमारत, मानसोपचार तज्ज्ञ विभाग, नेत्र विभाग, ईएनटी इमारत रिकामी आहे, तसेच मायक्रो आणि ट्रॉमा अतिदक्षता विभागही नॉनकोविड रुग्णांसाठी खुला करण्यात आला आहे.
सीपीआरमध्ये मानसोपचार, कान, नाक, घसा, प्रसूती, सर्पदंश, श्वानदंश, तसेच अपघात झालेल्या रुग्णांवर आता पूर्वीप्रमाणे उपचार सुरू झाले आहेत. गेल्या साडेचार महिन्यांपासून या ठिकाणी केवळ आणि केवळ कोरोना रुग्णांवरच उपचार होत असल्याने जिल्ह्यातील अन्य आजारांच्या रुग्णांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. येथील कामकाज इतर रुग्णांसाठीही सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चौकट
अधिष्ठातांनी घेतली बैठक
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी बुधवारी दुपारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. पुन्हा पूर्वीप्रमाणे सीपीआर हे अन्य आजाराच्या रुग्णांसाठी खुले करण्यात येत असल्याने प्रत्येक विभागाच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. आपापल्या विभागासाठी लागणारी औषधी, अन्य आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा ठेवण्याच्याही त्यांनी सूचना केल्या. त्यामुळे कोविड आणि विनाकोविड विभागासाठी मनुष्यबळाची वर्गवारी करण्याचे काम दिवसभर सुरू होते.
कोट
पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी सीपीआर लवकरच अन्य रुग्णांच्या सोयीसाठी सुरू करावे, अशा सूचना केल्या होत्या. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचीही संख्या कमी येत आहे. म्हणूनच गेल्या दोन दिवसांत तयारी करून आता बुधवारपासून सीपीआर पूर्वीप्रमाणे अन्य आजाराच्या रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे.
डॉ.एस. एस. मोरे
अधिष्ठाता, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर