‘सीपीआर’ आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:41+5:302020-12-07T04:19:41+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सद्य:स्थितीत ओसरल्याने आज, सोमवारपासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) हे पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सद्य:स्थितीत ओसरल्याने आज, सोमवारपासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) हे पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. त्यामुळे स्त्रीरोग व बाह्यरुग्ण विभाग वगळता सर्व बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) पूर्ववत सुरू होत आहेत. आरोग्य प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
गेले आठ महिने कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ‘सीपीआर’ रुग्णालय हे फक्त कोविड रुग्णालय केले होते. त्यामुळे इतर आजारांवरील रुग्णसेवा ही लाईन बझारमधील सेवा रुग्णालयाकडे वळविली होती.
गेल्या महिन्याभरात कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आल्याची दिलासादायक बाब आहे. त्यामुळे सीपीआर हे पूर्ववत सर्वच उपचारांसाठी खुले करण्यासाठी नागरिकांचा रेटा वाढत आहे. तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी चर्चा करून सीपीआर पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. यामुळे आज, सोमवारपासून सीपीआर रुग्णालय हे सर्व आजारांवरील उपचारांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे.
आज, सोमवारपासून डोळे, ऑर्थो, कान-नाक-घसा, सर्जरी, आदी सर्व बाह्य रुग्णसेवा (ओपीडी) सुरू होत आहे.
स्त्रीरोग ‘ओपीडी’ तूर्त बंदच
सीपीआर’मधील स्त्रीरोग बाह्यरुग्ण विभागात अद्याप कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे हा बाह्यरुग्ण विभाग करण्याबाबत डॉक्टरांत संदिग्धता आहे. त्यामुळे स्त्रीरोग ‘ओपीडी’ तूर्त बंदच राहण्याची शक्यता आहे.
आठ महिन्यांनी औषध विभाग सुरू
कोरोनामुळे ‘सीपीआर’मधील औषध विभाग हा गेले आठ महिने पूर्णपणे बंद होता. आता सर्वच ओपीडी सुरू करण्याचा निर्णय झाल्याने औषध विभागही पूर्ववत सुरू होत आहे.
कोरोना रुग्णांना स्वतंत्र कक्ष
‘सीपीआर’मध्ये कोरोना पॉझिटिव्हच्या मोजक्याच रुग्णांवर उपचार सुरू असल्याने या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापून त्यांच्यावर उपचार सुरू होत आहेत.
(तानाजी)