निवासी डॉक्टरांच्या संपामुळे कोल्हापुरातील सीपीआरमधील शस्त्रक्रिया ठप्प, वादावादीचे प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:56 PM2024-08-20T12:56:37+5:302024-08-20T12:57:29+5:30
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी आणि आंतरनिवासी ३५० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने ...
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी आणि आंतरनिवासी ३५० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने सीपीआरची आरोग्यव्यवस्था कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. शंभराहून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून, एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचारासाठी अपुरे डॉक्टर असल्याने वादावादीचेही प्रसंग घडत आहेत.
कोलकाता येथील आर.जी. कार महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या निषेर्धात निवासी, आंतरनिवास डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा सोमवार हा सातवा दिवस होता. सुरुवातीला दोन दिवस या आंदोलनाचा परिणाम जाणवला नाही. परंतु गेल्या तीन दिवसांपासून मात्र हा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. रुग्णालयात कनिष्ठ निवासी १५०, वरिष्ठ निवासी १०० आणि आंतरनिवासी वैद्यकीय अधिकारी १५० असे ३५० डॉक्टर्स कार्यरत असतात. याशिवाय रुग्णालयाचे ४५ वैद्यकीय अधिकारी असून, महाविद्यालयातील प्राध्यापक, विभागप्रमुखही वेळ पडल्यास सेवा देतात.
हे ३५० वरिष्ठ, कनिष्ठ निवासी आणि आंतरनिवासी डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असते. बाह्यरुग्ण विभाग हीच सर्व मंडळी हाताळत असतात. तसेच विविध विभागांतील प्राथमिक तपासणी आणि उपचाराची कामे, अपघात विभागातील जबाबदारी, विविध शस्त्रक्रियांमध्ये सहायक म्हणून ही मंडळी भूमिका बजावत असतात. परंतु गेले आठवडाभर काम बंद आंदोलनामुळे मात्र इथल्या वैद्यकीय सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. तातडीच्या शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील कर्तव्यावर मात्र ही सर्व मंडळी कार्यरत आहेत. या आंदोलनामुळे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी जबाबदाऱ्यांचे फेरवाटप करत विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, वरिष्ठ डॉक्टर्स यांच्यावर स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
परंतु कामाच्या वेगावर याचा परिणाम होत असून, एकीकडे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या वाढत असताना तितक्या वेगाने काम होत नसल्याने मग काही प्रमाणात वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाची क्लिनिकल आणि नॉन क्लिनिकलमध्ये विभागणी केली असली तरी क्लिनिकल विभागावर कामाचा ताण आला आहे. त्यामुळे कान, नाक, घसा, नेत्र विभागासह अन्य विभागांच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अस्थिव्यंगाच्याही शस्त्रक्रिया ज्या तातडीच्या नाहीत अशाही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शनिवारी आला प्रचंड ताण
या घटनेच्या निषेर्धात शनिवारी खासगी डॉक्टर्सनीही काम बंद ठेवले होते. एकीकडे सीपीआरमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मनुष्यबळ कमी असताना दुसरीकडे खासगी डॉक्टर्सही आंदाेलनात उतरल्याने सीपीआरवर मोठाच ताण आला. एरवी रोज १ हजार ते १३०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात दाखल होतात, तर त्या दिवशी १७०० हून अधिक रुग्ण या ठिकाणी नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसभर येथील तपासणी आणि उपचार सेवाही विस्कळीत झाली.
आंदोलनासाठी उभारला मंडप
निवासी, आंतरनिवासी डॉक्टरांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाच्या पुढच्या बाजूला मंडप उभारला असून, या ठिकाणी रोज हे डॉक्टर्स आंदोलनासाठी बसत आहेत. पहिल्या तीन दिवशी मेणबत्ती मोर्चा, निदर्शने करण्यात आली. यानंतर शहरातून मोठी रॅली काढण्यात आली तर रविवारी संध्याकाळी बिंदू चौकात मेणबत्त्या प्रज्वलित करून एकीकडे संबंधित महिला डॉक्टरला श्रद्धांजली वाहतानाच या घटनेचा निषेधही करण्यात आला.