भंडाऱ्यातील घटनेनंतर ‘सीपीआर’ची यंत्रणाही दक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:36+5:302021-01-10T04:18:36+5:30

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयामध्ये २८ सप्टेंबर २०२० च्या पहाटे लागलेल्या आगीनंतर तातडीने फायर ऑडिट केले गेल्याने यातील त्रुटीही ...

The CPR system is also vigilant after the incident at Bhandara | भंडाऱ्यातील घटनेनंतर ‘सीपीआर’ची यंत्रणाही दक्ष

भंडाऱ्यातील घटनेनंतर ‘सीपीआर’ची यंत्रणाही दक्ष

Next

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयामध्ये २८ सप्टेंबर २०२० च्या पहाटे लागलेल्या आगीनंतर तातडीने फायर ऑडिट केले गेल्याने यातील त्रुटीही दूर करण्यात आल्या आहेत. भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता या त्रुटी दूर केल्या असल्या तरी शनिवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी तातडीने बैठक घेत सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या.

भंडारा येथे आग लागून १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे येथील ‘सीपीआर’मधील नवजात शिशू विभागाला भेट दिली असता या ठिकाणी आधीच दक्षता घेतल्याचे पाहावयास मिळाले. या ठिकाणी सध्या १० बाळांवर उपचार सुरू आहेत. येथील अग्निशमन यंत्रणेच्या कुपीची तपासणी झाली होती. त्यावर रिफिलिंगची तारीख ३ जानेवारी २२ लिहिलेली होती. तसेच या विभागात नवे विद्युत फिटिंग केल्याचेही पाहावयास मिळाले.

सीपीआरमधील ट्रामा केअरला २८ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे आग लागली होती. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआर, इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाच्या काळातच तातडीने हे फायर ऑडिट करून घेण्यात आले. ऑडिटमध्ये ज्या काही सुधारणा सुचवण्यात आल्या, त्यांतील ९० टक्के सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही आपापल्या रुग्णालयांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोट

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वच विभागप्रमुखांची सकाळी बैठक घेण्यात आली आहे. भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- डॉ. एस. एस. मोरे

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

०९०१२०२१ कोल सीपीआर ०२

कोल्हापुरातील ‘सीपीआर’च्या नवजात शिशू विभागातील अग्निशमन यंत्रणेची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: The CPR system is also vigilant after the incident at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.