‘सीपीआर’मध्ये लवकरच प्रसूतिगृह अतिदक्षता विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:29 AM2018-04-02T00:29:09+5:302018-04-02T00:29:09+5:30

'CPR' will soon be involved in the delivery of the hospital | ‘सीपीआर’मध्ये लवकरच प्रसूतिगृह अतिदक्षता विभाग

‘सीपीआर’मध्ये लवकरच प्रसूतिगृह अतिदक्षता विभाग

Next

गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रसूतिकाळात होणारे माता-मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्रसूतिगृहाचे सहा खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने मान्यता दिली असून, बांधकामासाठी ७० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयातील हा पहिलाच प्रयोग आहे.
कोल्हापूरसह कोकण, सांगली, सातारा आणि सीमाभागांतून हजारो रुग्ण ‘सीपीआर’मध्ये रोज येतात. विशेषत: शहरातील कुटुंबकल्याण केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रसूती विभागातील अडचणीचे (गंभीर स्वरूपाचे) रुग्ण ‘सीपीआर’मध्ये येतात. त्यामुळे ‘सीपीआर’मधील प्रसूती विभागावर भार पडतो; पण नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एनआयसीयू), ट्रामा केअर सेंटर अतिदक्षता विभाग, कार्डियाकचा अतिदक्षता विभाग यावर प्रसूतिगृहातील गंभीर स्वरूपाच्या बाळंतिणीला अवलंबून राहावे लागते. सध्या प्रसूतिगृहात दिवसाला सरासरी २५ प्रसूती होतात.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्याकडे प्रसूतीगृहाचा अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्यासाठी जागेबाबत विचारणा केली.
त्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी एकत्रित बसून चर्चा केली व त्याला होकार दिला. त्यामुळे ‘सीपीआर’च्या आॅडिटोरियम हॉलच्या पाठीमागील जागेत लवकरच प्रशस्त व सुसज्ज असे प्रसूतिगृह अतिदक्षता विभाग सुरू होणार आहे. आयसीयूसाठी जादा वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ज्ञ, लिपिक व शिपाई तसेच वैद्यकीय उपकरणे लागणार आहेत.
याचबरोबर सहा खाटांबरोबर सहा व्हेंटिलेटर मिळणार आहेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी करण्यात आली असून, ७० लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील एक-दोन महिन्यांत अतिदक्षता विभागाचे बांधकाम सुरू होणार आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल उचलला नाही.
नकार दिला असता तर...
‘सीपीआर’च्या प्रसूतिगृह अतिदक्षता विभागाबाबत या रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला नकार दिला असता तर प्रसूतिगृहाचा अतिदक्षता विभाग हा मिरज (जि. सांगली) वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेला असता, असे सांगण्यात आले.
अशा स्वरूपाच्या रुग्णांवर होणार उपचार
अतिरक्तस्राव
अंगात रक्त कमी झालेले
रक्तदाब, मधुमेह रुग्ण
प्रसूतिपश्चात जंतुसंसर्ग

Web Title: 'CPR' will soon be involved in the delivery of the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.