‘सीपीआर’प्रश्नी तावडे यांच्यासोबत बैठक घेणार
By admin | Published: August 8, 2015 12:36 AM2015-08-08T00:36:40+5:302015-08-08T00:37:23+5:30
चंद्रकांतदादा पाटील : ‘सीपीआर बचाव कृती समिती’च्या शिष्टमंडळाला आश्वासन
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन मशीन तसेच डायलेसिस मशीन, आदी प्रश्नांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘सीपीआर बचाव कृती समिती’च्या शिष्टमंडळाला शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या धावत्या बैठकीत दिले.
यावेळी सीपीआरमधील पाचपैकी तीन डायलेसिस मशीन बंद आहेत. १३ पैकी १० व्हेंटिलेटर बंद आहेत. सिटी स्कॅन मशीनचा पत्ताच नाही, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा पुरेसा लाभ मिळत नाही, व्हेंटिलेटरसाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये लेखाशीर्ष सुरू करूनही अद्यापही व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आलेले नाही, अशा तक्रारींचा पाढाच समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी पालकमंत्र्यांसमोर वाचला. पालकमंत्र्यांच्या भेटीपूर्वी शाहू स्मारक भवनात सीपीआर बचाव कृती समितीची बैठक झाली. त्यामध्ये सीपीआरच्या गैरकारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सीपीआर परिसराची स्वच्छता करण्यात यावी, बंद पडलेली डायलेसिस यंत्रणा त्वरित सुरू करण्यात यावी, राजीव गांधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सिटी स्कॅन मशीनची खरेदी करण्यात यावी, हृदयरुग्ण विभाग पूर्ववत सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
‘सीपीआर’ हा गोरगरिबांचा आधारवड आहे. राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना सेवा देण्याऐवजी डॉक्टर त्यांना खासगी रुग्णालयात पाठवितात, असा आरोपही यावेळी करण्यात आला. माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे स्मारक सीपीआर आवारात उभारावे, अशी मागणीही करण्यात आली. मागण्या न मान्य झाल्यास सीपीआर बचावासाठी टप्पाटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारही करण्यात आला.
या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, बहुजन दलित महासंघाचे अध्यक्ष बबन सावंत, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, बबन रानगे, चंद्रकांत चव्हाण, शिवसेनेचे किशोर घाटगे, कादर मलबारी, सोमनाथ घोडेराव, प्रसाद जाधव, भाऊसाहेब काळे, आदी उपस्थित होते.