कोल्हापूरातील अंबाबाईच्या मूर्तीचे नाक, ओठ, हनुवटीला तडे- तज्ञांचा निष्कर्ष

By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 4, 2024 08:19 PM2024-04-04T20:19:32+5:302024-04-04T20:20:05+5:30

तज्ञांचा निष्कर्ष : तातडीने संवर्धन करण्याची गरज

Cracks on nose, lips, chin of Ambabai's idol in Kolhapur - expert's conclusion | कोल्हापूरातील अंबाबाईच्या मूर्तीचे नाक, ओठ, हनुवटीला तडे- तज्ञांचा निष्कर्ष

कोल्हापूरातील अंबाबाईच्या मूर्तीचे नाक, ओठ, हनुवटीला तडे- तज्ञांचा निष्कर्ष

इंदुमती सूर्यवंशी 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची मोठी झीज झाली आहे. तसेच मूर्तीचे नाक, ओठ, हनुवटीवर तडे गेले असून ते २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनात वापरल्या गेलेल्या साहित्यांच्या अवशेषांची आहे. मूर्तीचा चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष तज्ञांनी दिला आहे.

अंबाबाई मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्यासमोर सुरू आहे. या दाव्यात वादी गजानन मुनीश्वर व इतर यांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी अशी मागणी केली होती. न्यायालयीन आदेशानंतर पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी १४ व १५ मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल गुरुवारी न्यायालयात सादर झाला.
आठ पानाच्या या अहवालात त्यांनी २०१५ साली अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तसेच मूर्तीवरील अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या सुनावणीला ॲड. नरेंद्र गांधी, ॲड. ओंकार गांधी, वादी गजानन विश्वनाथ मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई, ॲड. प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

उपाय काय ?

अंबाबाईची मूर्ती भक्कम करण्यासाठी ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे मुजवता येतील. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील. अखेरीला रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल.

मूर्ती हाताळण्यासंबंधीचे नियम
- वेळोवेळी मूर्तीचे निरीक्षण करून योग्य ती काळजी घेणे.

-मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे.
-मूळ मूर्तीला पुष्पहार वगैरे न घालता केवळ उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालणे.

-गर्भगृहातील संगमरवर काढणे .
-कीटकांचा उपद्रव होऊ नये यासाठी उपाययोजना करणे.

- तसेच आर्द्रता व तापमान यांचे नियंत्रण करणे
-अलंकार व किरीट घालताना योग्य ती काळजी घेणे

Web Title: Cracks on nose, lips, chin of Ambabai's idol in Kolhapur - expert's conclusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.