स्टीलच्या आभूषणांवर तीन महिन्यांपासून कलाकुसर; किरीट, त्रिशूळला गणेश भक्तांची पसंती
By संदीप आडनाईक | Published: September 13, 2023 02:03 PM2023-09-13T14:03:26+5:302023-09-13T14:04:05+5:30
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीसाठी या आभूषणांना मोठी मागणी
कोल्हापूर : लाडक्या बाप्पांचे स्वागत करण्यासाठी बनविलेल्या विविध प्रकारच्या आभूषणांना गणेश मंडळ आणि गणेश भक्तांची मोठी पसंती आहे.
गणेशमूर्तीना आणखी उठावदार करण्यात हातभार लागतो तो माजगावकर कुटुंबीयांचा. यासाठी भाविकांची पावले पापाच्या तिकटीला वळतात. किरीट, त्रिशूळ, परशू, सुदर्शन चक्र, तलवार, भाला, इंद्रधनुष्य, कमळ अशाप्रकारची आभूषणे माजगावकर कुटुंब बनवितात. प्रामुख्याने स्टीलमध्ये बनविलेले हे आभूषण जास्त विकले जाते. त्याखालोखाल तांबे आणि पितळेपासून बनविलेल्या आभूषणांना गणेश मंडळ आणि गणेश भक्तांची मोठी पसंती आहे. विशेषतः दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीसाठी या आभूषणांना मोठी मागणी आहे.
त्रिशूळ आणि परशू ३० रुपये जोडीपासून ३५० रुपयांपर्यंत , कमळ फूलं २५० रुपये पासून ६००० रुपयांपर्यंत जोडी उपलब्ध आहे. कमळ आसन ६०० रुपयांपासून ६००० रुपये जोडीपर्यंत उपलब्ध आहेत. हातातले कमळ २५० रुपये जोडी आहे. हे हस्तकौशल्य आणि कलाकुसरीचे काम असल्यामुळे यासाठी तीन महिने आधीपासून तयारी सुरू होते. किरीट, त्रिशूळ याशिवाय मोदक, जास्वंद फुले कमळ फुले, उपरणे, प्रभावळही बाजारात उपलब्ध आहेत. गुजरी, महाद्वार रोड, स्टेशन रोड, शाहूपुरी, राजारामपुरीतील पदपथावरही या वस्तू विक्रीसाठी आहेत.
अशी बनतात आभूषणे
२०१८ पासून थर्माकोलवर बंदी घातल्यामुळे माजगावकर कुटुंबीय स्टीलपासूनचे आभूषणे तयार करतात. यासाठी स्टीलच्या पाईप्स, २६ गेजचे गॅलव्हनाईज पत्रे यांचा वापर करून ही आभूषणे बनवितात.