खणदाळच्या युवा गायकाचे कर्नाटकात कर्तृत्व
By admin | Published: March 23, 2015 11:15 PM2015-03-23T23:15:02+5:302015-03-24T00:13:25+5:30
अनेक स्पर्धा जिंकल्या : संगीताचा कसलाही वारसा नसताना अमित चौगुलेचे संगीत क्षेत्रात यश
संजय थोरात- नूल महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न केव्हा सुटणार आहे हे कुणालाच माहीत नाही. मात्र, महाराष्ट्रातील एका युवा गायक-संगीतकाराने कर्नाटक चित्रपट क्षेत्रात ठसा उमटवला आहे. त्याच्या गाण्यांना कर्नाटकातील सोशल मीडियात हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. अमित अशोक चौगुले (रा. खणदाळ, ता. गडहिंग्लज) असे या युवा गायक संगीतकाराचे नाव आहे.
संगीताचा कसलाही वारसा नसताना अमितने जिद्द, मेहनतीच्या जोरावर आणि वडील अशोक यांच्या आर्थिक पाठबळावर संगीतक्षेत्रात स्थान मिळविले आहे. खणदाळ, हलकर्णीत त्याचे माध्यमिक, तर निडसोशी, बेळगावात त्याचे उच्च शिक्षण झाले. त्याने एमसीए संगणक अभियंत्याची पदवी घेतली आहे. ‘२०११ ला व्हाईस आॅफ गडहिंग्लज’ ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्यातील खरा कलाकार जिवंत झाला. मग त्याने शरद कुर्डेकर यांच्याकडून गिटार हे वाद्य, तर स्वरसाधना संगीत विद्यालयात पंडित मच्छिंद्र बुवा यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे ज्ञान प्राप्त केले. कोल्हापूरच्या कॉर्डज् संगीत स्टुडिओत त्याला आवाजाबद्दल तांत्रिक ज्ञान मिळाले.अनुराग जिजस अकॅडमीने तयार केलेला ‘जिजस इज माय फे्रंड’ हा त्याचा पहिला आॅडिओ अल्बम प्रसिद्ध झाला. लंडनमध्ये या अल्बमच्या प्रती विकल्या गेल्या. ‘कार मुगिलू’ या कन्नड चित्रपटात त्याने स्वत:च्या आवाजात एक गाणे गायिले आहे. याच गाण्याच्या ‘टिझर’ने कर्नाटकातील सोशल मीडियावर युवकांमध्ये धुमाकूळ घातला आहे. टी.व्ही.नाईन, समया टी.व्ही.ने याची दखल घेतली आहे. सध्या हा चित्रपट अंतिम टप्प्यात आहे. अमितने स्वत: संगीतबद्ध करून गायलेला ‘ओ जिववे’ हा अल्बम एप्रिल - मे महिन्यांत रिलीज होतोय. कुंपण फेम चंद्रशेखर जानवाडे, हर्षद शिरगुप्पी, काडेश बस्तवाडे यांची गीते आहेत.वडील अशोक चौगुले स्वत: प्रोड्युसर आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळी, तेलगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये तो गातो. सुमारे ६० ते ७० गाण्यांच्या चाली त्याने स्वत: घरी बसून तयार केल्या आहेत. घरातच त्याचे रेकॉर्डिंग साहित्य आहे. गिटार, की-बोर्ड, पियानो, हार्मोनिअम ही वाद्ये तो वाजवतो. आकाशवाणीवर त्याचे कार्यक्रम झाले आहेत. तो मिमीक्रीसुद्धा करतो. चित्रकलेत त्याचा हातखंडा आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते त्याचा युवा गायक म्हणून सत्कार झाला. भौगोलिक व भाषेच्या सीमा पार करून या युवा कलाकाराने कर्नाटकात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.
मराठी संगीतक्षेत्रात अमितने खूप मेहनत घेतली. मात्र, अनेकदा ‘तोंडचा घास’ हिरावून घेतला गेल्याने तो अपसेट झाला अन् कर्नाटकात स्थिरावला. मराठीत कोणी गॉडफादर नसल्याने मागे पडल्याची खंत त्याच्या मनात आहे.
संगीतवेड्या तरुणाचे शिक्षणात लक्ष नव्हते. महाविद्यालयाने त्याला हकलवून लावले होते. मात्र, त्याच महाविद्यालयाने अमितचे कर्तृत्व पाहून पुन्हा बोलावून घेतले.