द. महाराष्ट्रात महागड्या गाड्यांची क्रेझ
By admin | Published: August 4, 2016 01:11 AM2016-08-04T01:11:36+5:302016-08-04T01:21:37+5:30
उदय लोखंडे : टोल संकल्पनाच बंद करायला हवी, एकच रोड टॅक्स हवा
साऊथ महाराष्ट्र आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनची नुकतीच सातारा येथे बैठक झाली. या बैठकीत साऊथ महाराष्ट्र आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या ट्रेन्डी व्हीलचे अध्यक्ष उदय लोखंडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील डिलर सहभागी झाले होते. आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनच्या अडचणी व आॅटोमोबाईल क्षेत्राबाबतची सध्याची स्थिती मांडली. टोल संकल्पनाच बंद करून एकदाच रोड टॅक्स करावा, असे परखड मत त्यांनी ‘लोकमत’च्या थेट संवादात मांडले.
प्रश्न : गाडी पंधरा वर्षांनंतर स्क्रॅप करावी का?
उत्तर : कोणत्याही गाडीचे आयुष्य हे पंधरा वर्षे असते. त्यानंतर गाडीचे काम निघते. गाडी धूर सोडायला लागते. प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो; म्हणूनच विदेशात पंधरा वर्षांनंतर गाडी स्क्रॅप केली जाते आणि भारतातही दिल्लीमध्ये ही संकल्पना राबविली जात आहे. भविष्यात सर्वत्र ही संकल्पना येईल. गाडी ही चैनीची वस्तू नसून गरज बनली आहे. त्यामुळे बाजारात नवनवीन गाड्या येत आहेत. ग्राहकही दुरुस्तीऐवजी एक्स्चेंजवर भर देऊन जुनी गाडी देऊन नवीन गाडी घेत आहेत.
प्रश्न : आॅटोमोबाईलची सध्याची परिस्थिती काय आहे ?
उत्तर : आॅटोमोबाईल क्षेत्राला गेल्या दोन-तीन वर्षांत मोठी मंदी होती. मागणीच नव्हती. कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग शेती आणि पाऊस यावरच प्रामुख्याने अवलंबून आहे. गेल्या तीन वर्र्षांत पावसाचे अल्प प्रमाण झाले होते. गेल्या वर्षी तर संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे याचा परिणाम गाड्या खरेदीवर झाला. गाड्यांची विक्री थंडावली होती. पण गेल्या एप्रिल महिन्यापासून परिस्थिती थोडी सुधारली आहे. गाड्या खरेदीबाबत लोकांचे मनपरिवर्तन होत आहे. त्यात आता चांगला पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची पिके चांगली येतील. शेतकऱ्यांकडे पैसे आले की विक्री आपोआपच वाढते. त्यामुळे चालू वर्षांपासून आॅटोमोबाईल मार्केट निश्चितच चांगले सुधारेल आणि गाड्यांची विक्री वाढेल.
प्रश्न : ग्राहक गाडी खरेदी करताना कोणता विचार करतो?
उत्तर : ग्राहक गाडी खरेदी करताना त्या गाडीची किंमत, मेन्टेनन्स, सुटे भाग, तत्काळ कर्ज उपलब्ध या गोष्टी पाहतो. आपल्याकडे प्रत्येक सहा महिन्याला विविध कंपनीच्या नवीन दुचाकी आणि चारचाकी गाड्या बाजारात उपलब्ध होत आहेत. ग्राहकाला चॉईस मिळाला आहे. ज्या गाड्यांची किंमत कमी आहे. आकर्षक योजना आहेत. गाडीचा मेन्टेनन्स कमी आहे. कमी कागदपत्रात तत्काळ फायनान्स उपलब्ध होतो तिकडे ग्राहक वळतो. आणि प्रामुख्याने गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला सेवा देणे हे महत्त्वाचे ठरते.
प्रश्न : डिलरांना कोणत्या अडचणी येतात.
उत्तर : साऊथ महाराष्ट्र आॅटोमोबाईल डिलर असोसिएशनच्या अंतर्गत कोल्हापूर डिस्ट्रीक्ट असोसिएशन, सांगली डिस्ट्रीक्ट असोसिएशन आणि सातारा डिस्ट्रीक्ट असोसिएशन या तीन जिल्हास्तरीय असोसिएशन येतात. तीन जिल्ह्यांत दुचाकी, चारचाकी, हेवी व्हेईकलचे शंभरहून अधिक डिलर आहेत. प्रामुख्याने गाड्यांचे पासिंग लवकर झाले पाहिजे. पासिंग प्रक्रिया खूप किचकट आहे. ती सुलभ झाली पाहिजे. पासिंग वेळेवर झाले नाही की नंबर वेळेवर मिळत नाही. ग्राहक नाराज होतो. मग विना पासिंग गाडी फिरवली आणि पोलिसांना सापडली तर मोठा दंड आकारणी केली जाते. कायद्याचा अर्थ वेगवेगळा काढला जातो. त्यामुळे पासिंग लवकर होणे गरजेचे आहे. कंपन्यांचे प्रेशर असते गाड्यांची विक्री करण्यासाठी. त्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पण या सर्वांवर असोसिएशनच्या माध्यमातून योग्य तोडगा काढला जातो.
प्रश्न : गाड्या चालवताना कोणती सुरक्षा बाळगायची ?
उत्तर : दुचाकी चालवताना चाळीसची स्पीड मर्यादा असली पाहिजे, दुचाकीस्वाराने हेल्मेट स्वत:च्या सुरक्षेसाठी घातले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट लावूनच गाडी सुरू केली पाहिजे. गाड्यांची स्पीड मर्यादा ८0च्या वर नसावी, टायरमधील हवा तपासली पाहिजे. गाडीचे सर्व्हिसिंग वेळेवर केले पाहिजे. गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. गाडी चालवताना मद्यप्राशन करू नये.
प्रश्न : वर्षाला गाड्यांची विक्री किती होते ?
उत्तर : कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतून दुचाकी, चारचाकी, ट्रक, बॅक हो लोडर आणि हेवी व्हेईकल अशी चार लाखांवर विक्री होते.
प्रश्न : रस्त्यांवरील टोलबाबत आपले मत काय?
उत्तर : संपूर्ण भारतात सर्वांत जास्त टोल हा महाराष्ट्रात आकारला जातो. मुंबईला जायचे म्हटले तरी किमान हजार रूपये टोल भरावा लागतो. हे लहान चारचाकी गाड्यांचे झाले. पण मोठ्या हेवी व्हेईकल गाड्यांना जास्त टोल बसतो. टोल ही संकल्पनाच मुळात काढून टाकली पाहिजे. त्याऐवजी एकच रोड टॅक्स आणला पाहिजे आणि तोही गाडी खरेदी करताना एकदाच भरून घेतला पाहिजे. टोलमुळे हेवी व्हेईकल आणि ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. पण एवढा टोल भरूनही महाराष्ट्रातील रस्ते मात्र खूपच खराब आहेत. आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात कितीतरी पटीने चांगले रस्ते आहेत.
प्रश्न : दक्षिण महाराष्ट्राला महागड्या गाड्यांची भुरळ आहे का?
उत्तर : हो, कोल्हापूर, सांगली, सातारा या दक्षिण महाराष्ट्रातील ग्राहक हौशी आहे. भारतात कोणतीही गाडी आली आणि ती या दक्षिण महाराष्ट्रात नाही असे कधी झालेले नाही. नवीन गाडी आली की कोल्हापूर, सांगली, सातारा येथील लोकांचे बुकिंग ठरलेले असते. अनेक गाड्यासाठी वर्ष-वर्षभर वेटिंगला थांबतात पण आलिशान आणि महागड्या गाड्या घेतात. येथील लोक हौशी आहेत आणि महागड्या गाड्यांची याठिकाणी क्रेझ आहे. गाड्यामध्ये आता कलर कॉम्बीनेशन आले आहे. विविध कलरमध्ये गाड्या रस्त्यावर फिरवताना दिसत आहेत.
- सतीश पाटील