कुरुंदवाड पालिकेत हाणामारी
By Admin | Published: February 23, 2017 12:51 AM2017-02-23T00:51:46+5:302017-02-23T00:51:46+5:30
रामचंद्र डांगे-जवाहर पाटील भिडले; इतिवृत्त वाचण्याच्या कारणावरून वादावादी
कुरुंदवाड : येथील नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात हाणामारी झाली. मागील विषयांचे इतिवृत्त वाचन करण्याच्या विषयावरून उपनगराध्यक्ष जवाहर पाटील व विरोधी पक्षनेता रामचंद्र डांगे यांच्यात वादावादी होऊन प्रकरण अखेर हातघाईवर आले. यावेळी उपनगराध्यक्ष पाटील आणि विरोधी पक्षनेता डांगे, नगरसेवक उदय डांगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या या हाणामारीमुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले. यानंतर विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. सभेला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पालिकेतील विविध विषयांवर चर्चा करून मंजुरीसाठी पालिकेने सर्वसाधारण सभेचे आज, बुधवारी आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली. प्रारंभी विषयपत्रिकेवरील मागील सभेचे इतिवृत्त वाचनाचा विषय घेण्यात आला. त्यामधील विषयांचे वाचन सुरू असताना उपनगराध्यक्ष पाटील यांनी मागील सभेला सर्वच नगरसेवक उपस्थित असल्याने त्यामध्ये वेळ घालविण्यापेक्षा पुढील विषय घ्या, असे सुचविताच विरोधी पक्षनेता डांगे यांनी इतिवृत्त वाचण्याचा आग्रह धरला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वादावादी होऊन डांगे यांनी अंगावर जाताच त्यांच्या पाठोपाठ नगरसेवक उदय डांगे व समर्थकांनी सभागृहातच प्रचंड हाणामारी सुरू केली.
पालिका सभागृहात हाणामारी सुरू असल्याचे समजताच दोन्ही गटांच्या समर्थकांनी पालिकेत गर्दी केली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. काही वेळानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली. प्रत्येक विषयाला डांगे यांनी सत्ताधारी व प्रशासनाला धारेवर धरले. तणावग्रस्त वातावरणातच विषयपत्रिकेवरील २६ विषयांना मंजुरी दिली. दरम्यान, आयत्यावेळच्या विषयावर विरोधी पक्षाला केबिन अद्याप मिळाली नसल्याने सध्याची उपनगराध्यक्षांची केबिन विरोधी पक्षाला देण्याचा आग्रह डांगे यांनी धरल्याने डांगे व नगराध्यक्ष पाटील यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली. अखेर सभेनंतर सामोपचाराने केबिनचा विषय संपविण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधक शांत झाले.
यावेळी नगरसेवक उदय डांगे, वैभव उगळे, पाणीपुरवठा सभापती दीपक गायकवाड, प्रा. सुनील चव्हाण, अक्षय आलासे, अनुप मधाळे यांनी चर्चेत भाग घेतला. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी बांधकाम सभापती स्नेहल कांबळे, सुजाता डांगे, गीता बागलकोटे, किरण जोंग, सुशीला भबिरे, नरगीस बारगीर, समरीन गरगरे, मुमताज बागवान, जरिना गोलंदाज, सुजाता मालवेकर, आदी उपस्थित होते.