कोरोनाच्या कोलाहलात निराशा झटकून सकारात्मक वातावरण तयार करा; शिवानीदीदींचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:14 AM2021-04-28T06:14:54+5:302021-04-28T06:15:06+5:30

शिवानीदीदी यांचे प्रतिपादन; मी स्वस्थ आहे, निरोगी आहे असा संकल्प करू या

Create a positive atmosphere by shaking off frustration at the noise of the corona | कोरोनाच्या कोलाहलात निराशा झटकून सकारात्मक वातावरण तयार करा; शिवानीदीदींचे प्रतिपादन

कोरोनाच्या कोलाहलात निराशा झटकून सकारात्मक वातावरण तयार करा; शिवानीदीदींचे प्रतिपादन

Next

समीर देशपांडे

कोल्हापूर : कोरोनाच्या आपत्तीने आपल्याला शरीराच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे.  परंतु, त्या तुलनेत अजूनही आपण महत्त्वाच्या अशा मन:स्वास्थ्याकडे लक्ष देत नाही. या काळात मनाच्या स्वास्थ्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी निराशा झटकून प्रत्येकाने समाजात, कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या वरिष्ठ अध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या शिवानीदीदी यांनी केले.कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र नकारात्मक वातावरण पसरत असताना नागरिकांना सकारात्मक संदेश देण्यासाठी ‘लोकमत’ने शिवानीदीदी यांची खास मुलाखत घेतली. 

शिवानीदीदी म्हणाल्या, या काळामध्ये आपण शरीराची काय काळजी घेतली पाहिजे, हे विविध माध्यमातून सांगण्यात येत आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीचा विपरीत परिणाम मनावर होऊ लागल्याने मनुष्य निराशेकडे जात आहे. हे थांबवण्यासाठी सकाळपासून आपण सकारात्मक विचार करण्याची, शरीराबरोबरच मनाचीही प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज असते. कारण, मानसिक अवस्थेचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो.

सकाळी उठल्यानंतर आपण लगेचच मोबाइल हातामध्ये घेतो. त्यावर खरी, खोटी माहिती आलेली असते. अनेकदा अशास्त्रीय माहितीदेखील येते. ती आपण वाचतो आणि दिवसाची आपली सुरुवात वेगळ्या वातावरणाने होते. त्यापेक्षा मी स्वस्थ आहे, निरोगी आहे असा  संकल्प करा. हाच संकल्प आपल्याला सिद्धीस नेतो. आपल्या स्वत:मधील शक्तीला ओळखून तिच्याविषयीही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. सकारात्मक विचारांचे व्हिडिओ पाहणे, माहिती वाचणे हेही सातत्याने केले पाहिजे. यानंतर प्राणायाम, योगासने करून शरीराचीही काळजी घेतली पाहिजे.

दिवसभरामध्ये आपली कर्तव्ये पूर्ण झाल्यानंतर घरी आल्यानंतरही परिवाराशी गप्पा मारून आपले दिवसभरातील चांगले अनुभव त्यांना सांगितले पाहिजेत. त्यांचे चांगले अनुभव ऐकून घेतले पाहिजेत. भोजनावेळीही परिस्थिती प्रसन्न असावी. टीव्ही सुरू आहे, लॅपटॉपवर काम सुरू आहे, मोबाइल बघतच भोजन सुरू आहे, हे टाळले पाहिजे. भोजन बनवणाऱ्यांनीही मनापासून ते बनवले पाहिजे. मंदिरामध्ये जसे वातावरण असते, तसेच वातावरण भोजनगृहामध्येही हवे. भजन लावून भोजन तयार केले पाहिजे आणि सेवनही केले पाहिजे. या सगळ्याचा एक विधायक परिणाम मनावर होत असतो.

हे करा...

सकाळी उठल्यानंतर परमात्म्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा.त्यानंतर मी शक्तिशाली आहे, निर्भय आहे, शांत आहे, स्थिर आहे, माझे शरीर निरोगी आणि स्थिर आहे, असा सकारात्मक संकल्प करा.कोरोनाच्या आजारातून लाखो जण बरे होऊन घरी आले आहेत, हे मनाला सांगा.
सकाळी व झोपण्याआधी तुम्हाला आवडेल असे पुस्तक वाचा, संगीत ऐका.
परिवारातील सदस्यांशी गप्पा मारा.
दिवसभरामध्ये सात्त्विक आहार घ्या.

हे करू नका...

सकाळी उठल्यानंतर लगेचच मोबाइल हातात घेऊ नका.
कोरोनाच्या विदारकतेचे दर्शन घडवणारी तीच तीच माहिती शेअर करू नका.
पॉझिटिव्ह रुग्णाशी किंवा नातेवाईकांशी बोलताना नकारात्मक बोलू नका, त्यांचा उत्साह वाढेल अशा गप्पा त्यांच्याशी मारा.
रात्री झोपण्यापूर्वी तासभर टीव्ही, मोबाइल दूर ठेवा.

Web Title: Create a positive atmosphere by shaking off frustration at the noise of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.