समताधिष्ठित समाज घडवूया
By admin | Published: April 19, 2017 01:13 AM2017-04-19T01:13:05+5:302017-04-19T01:13:05+5:30
शरद गायकवाड यांचे प्रतिपादन : मूलनिवासी मेळाव्यात प्रबोधन सत्र
कोल्हापूर : महापुरुषांच्या स्वप्नातील समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी वेळ, पैसा, श्रम आणि बुद्धी खर्च करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी मंगळवारी येथे केले.
येथील मूलनिवासी संघातर्फे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांची १९० वी आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित मूलनिवासी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र श्रावस्ती, तर प्रा. प्रभाकर निसर्गंध प्रमुख उपस्थित होते. मेळाव्यातील प्रबोधन सत्राचा विषय ‘समता नाकारण्यासाठी समरसतेचे ढोंग’ असा होता. प्रा. गायकवाड म्हणाले, देशाला क्रांती, प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. महापुरुषांनी क्रांती केली, तर प्रतिक्रांतीने महापुरुषांच्या विचारांचे अपहरण केले. समतावादींचा विषमतावादीकडून छळ झाला. समताधिष्ठित समाज निर्माण करणे हे महापुरुषांचे स्वप्न होते. त्यासाठी ते आयुष्यभर झटले. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान, वस्तूंचे अपहरण केले जात आहे. त्यामुळे या देशात क्रांती-प्रतिक्रांती दिसत आहे.
समताधिष्ठित समाज घडविण्यासाठी वेळ, पैसा, श्रम, बुद्धी खर्च करूया. शिवाय समता, न्याय, बंधुभाव रुजलेला समाज घडूवया. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमार कांबळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. प्रमोद कोल्हे यांनी काव्यवाचन केले. यावेळी राजू कांबळे, मूलनिवासी संघाचे एसईसी सदस्य तुषार गवळी, आदी उपस्थित होते. मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. राहुल ढाले यांनी सूत्रसंचालन केले. बामसेफचे जिल्हाध्यक्ष एस. के. धनवडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सामाजिक संस्थांचा सत्कार
या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सामाजिक चळवळीतील संस्थांना ‘मूलनिवासी लढा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, समविचारी परिवर्तन मंच, नालंदा अकॅडमी, प्रज्ञा प्रकाशन, धम्म संस्कार केंद्र, बहुजन हिताय वसतिगृह, भरारी एज्युकेशनल अॅण्ड सोशल फौंडेशन, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघ, आम्ही कोल्हापुरी, कास्ट्राईब कोल्हापूर, बुद्धभूषण या संस्थांचा समावेश होता. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
वाचणे सुरू व्हावे
सध्या महापुरुषांच्या जयंतीदिनी डॉल्बीवर नाचणे सुरू झाले आहे. ते बंद होऊन समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी वाचणे सुरू व्हावे, अशी अपेक्षा प्रा. गायकवाड यांनी व्यक्त केली.