फ्रान्समध्ये घडवितोय ई- कॉमर्समध्ये भविष्य --

By admin | Published: October 4, 2015 11:32 PM2015-10-04T23:32:26+5:302015-10-05T00:08:53+5:30

कोल्हापूरच्या अमित चौगुले ची यशोगाथा-- ग्लोबल कोल्हापूर

Creating a Future in e-commerce in France | फ्रान्समध्ये घडवितोय ई- कॉमर्समध्ये भविष्य --

फ्रान्समध्ये घडवितोय ई- कॉमर्समध्ये भविष्य --

Next

आंतराष्ट्रीय स्तरावरील अनुभव व उच्च शिक्षणासाठी अमित अशोक चौगुले याने २०११ ला फ्रान्सला जिद्दीने प्रयाण केले. उच्च शिक्षणानंतर तेथे नोकरीमध्ये यश मिळविले.त्याला भविष्यात कोल्हापुरात स्वत:चे अस्तित्व दाखवायचे आहे.
अमित अशोक चौगुले याने भारती विद्यापीठमध्ये पदवीचे शिक्षण व पुण्यातील नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर उच्च शिक्षण व नोकरीसाठी फ्रान्सला जाण्याचा निर्णय घेतला. फ्रेंच भाषा अवगत करून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरी तसेच व्यवसायाचा अनुभव मिळविला. याच अनुभवाच्या आधारे भविष्यकाळात कोल्हापुरातच 'ई-कॉमर्स' व्यवसायाची सुरुवात करण्याचा मानस असल्याचे अमितने स्पष्ट केले.
अमितचे वडील अशोक चौगुले हे बँक आॅफ इंडियात कार्यरत असल्याने त्यांना अनेकजण परदेश दौऱ्यावर जात असल्याची माहिती होती. अमितने २०११ ला फ्रान्सला प्रयाण केले. त्याला सुरुवातीला फ्रेंच भाषा येत नव्हती. फक्त ‘बोन्जोर (नमस्कार) आणि मर्सी (धन्यवाद )’ हे दोनच शब्द माहीत होते. या दोन शब्दांच्या जोरावर अनोख्या देशात प्रवेश केला. तिकडे इमिग्रेशनपासून ते घर शोधताना तसेच दुकानातून सामान घेतानाही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे फ्रेंच लोकांचे त्यांच्या भाषेवरचे अतूट प्रेम. कुठेही गेले तरी फ्रेंच भाषा वापरण्यावरच त्यांचा आग्रह असायचा आणि ते इतरांनासुद्धा इंग्रजीऐवजी मातृभाषा वापरण्यासाठी प्रोत्साहन देतात.
अमित सांगतो, उत्तर फ्रान्सच्या लिल्ल शहरात माझे कॉलेज होते. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या साधारण १८ देशांतील ५०-६० हुशार मुला-मुलींनी भरलेल्या त्या वर्गात दचकत दचकतच प्रवेश केला; पण वर्षभरातच तिथे पॅरिसमध्ये कोल्हापुरात जसे गल्लीतले, चौकातले मित्र भेटतो, तसे राहू लागलो. सुरुवातीच्या काळात एक-दोन महिने घरी न सांगता एका रेस्टॉरंटमध्ये काम केले. एक-एक युरोची किंमत तिथे कळत होती. गिरीश, विनीत, नवीन, हेमलतासारखे जीवलग मित्र-मैत्रीण मला येथेच भेटले. त्यांनी मला त्या काळात खूपच मौलाची मदत केली. धीर दिला. उच्च शिक्षण व फ्रान्समधील प्रशिक्षण संपविले. त्यानंतर नोकरी शोधण्यासाठी मी आणि काही भारतीय मित्र आम्ही ‘करिअर फेयर’ करण्याचे ठरविले. तेव्हा फ्रान्समधल्या सर्व शहरांतल्या विद्यार्थी आणि इतर भारतीयांची ओळख यातून झाली. कॉलेज आणि इंटर्नशिपचे दिवस अगदी मजेत गेले; पण खरी परीक्षा यापुढे होती.
पुढे तिथे नॉमंर्डीमधेच सहा महिन्याची इंटर्नशिप करण्याची संधी घेतली. इंटर्नशिप संपवून नोकरीचा शोध सुरू केला. व्हिसा संपायच्या आठ दिवस आधी जगातल्या सगळ्यात मोठ्या ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातल्या ‘रॉकेट इंटरनेट’ या कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली. मेहनत, प्रामाणिकपणा व एकाग्रता जपत अखेर त्याच कंपनीत जिद्दीच्या जोरावर प्रमोशनही घेत उच्च पदापर्यंत यश मिळविले. तेव्हा मात्र आजवर केलेला संघर्ष, धडपड सार्थक झाल्याचे वाटले. अडचणीच्यावेळी मित्रांनी केलेली मदत आणि दिलेला धीर यामुळेच हे यश मिळवू शकलो याची जाणीवही झाली. माझ्यासारखेच २० ते २५ भारतीय तरुण, तरुणी पॅरिसमध्ये या कंपनीत चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. केवळ स्वकौशल्यावरच आपल्याला यश व प्रगती साधायला लागते हे मात्र खरे. फ्रान्समधील लोक प्रेमळ, मदतगार वाटले. भविष्यात कोल्हापूरमध्ये ‘ई-कॉमर्स’ व्यवसायाची सुरुवात करण्याचा मानस असून, जे पॅरिसला जाऊ इच्छितात, त्यांना तेथील शिक्षण, जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्याचा उद्देश असल्याचे अमितने स्पष्ट केले. ’’’ - शेखर धोंगडे-

Web Title: Creating a Future in e-commerce in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.