विश्वकोश ज्ञानमंडळांच्या माध्यमातून नवी ज्ञानसंस्कृती निर्माण : दिलीप करंबेळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 03:00 PM2018-12-12T15:00:47+5:302018-12-12T15:02:50+5:30
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले.
कोल्हापूर : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले.
विश्वकोश निर्मिती मंडळ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित आधुनिक इतिहास ज्ञानमंडळाच्या नोंदलेखक कार्यशाळेत ते बोलत होते. विद्यापीठातील इतिहास अधिविभागामधील या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.
अध्यक्ष करंबेळकर म्हणाले, मातृभाषेतून मिळालेले ज्ञान परिवर्तनास पोषक असते; त्यामुळे इतिहास लेखकांनी तटस्थपणे नोंदलेखन करून ते पुढील पिढ्यांसाठी ज्ञानसंचित राहील, याची काळजी घ्यावी. डॉ. भारती पाटील म्हणाल्या, व्यक्तीची सामाजिक व राजकीय भूमिका इतिहासातून घडत असते, त्यासाठी निष्पक्ष इतिहास लेखन करावे.
या कार्यक्रमात आधुनिक इतिहास ज्ञानमंडळाच्या फलकाचे अनावरण प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. विश्वकोश मंडळाचे सदस्य डॉ. अरुणचंद्र पाठक, विद्याव्यासंगी सहायक संपादक सरोजकुमार मिठारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस, डॉ. नीलांबरी जगताप, उमाकांत खामकर उपस्थित होते. समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय मचाले यांनी सूत्रसंचालन केले.
इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी आभार मानले. दरम्यान, या कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरीतील इतिहास अभ्यासक, लेखक सहभागी झाले होते.