शेंडा पार्कमधील झाडे जगवण्यासाठी सृजन धडपड (पुन्हा पाठवत आहे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:46+5:302021-03-21T04:22:46+5:30
कोल्हापूर : शेंडा पार्क येथील जळलेले वृक्ष जगविण्यासाठी ‘सृजन आनंद’चे चिमुकले पुढे सरसावले आहेत. बादलीने वनराईला पाणी घालताना मुलांमधील ...
कोल्हापूर : शेंडा पार्क येथील जळलेले वृक्ष जगविण्यासाठी ‘सृजन आनंद’चे चिमुकले पुढे सरसावले आहेत. बादलीने वनराईला पाणी घालताना मुलांमधील सामाजिक व पर्यावरणीय जाणिवांची मुळंही घट्ट रोवली गेली. यावेळी कोल्हापूर एरो माॅडेलर ग्रुपचे सनीत शिपूरकर व सदस्यांनी एरो माॅडेलिंगची प्रात्यक्षिके सादर करून मुलांचे मनोरंजन केले. सुचेता पडळकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला.
दिवंगत प्राचार्य लीला पाटील यांनी सुरू केलेली सृजन आनंद शाळा म्हणजे हसत-खेळत आनंददायी व अर्थपूर्ण शिक्षण देणारे विद्यामंदिर आहे. कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंद असल्या, तरी बालकांनी सामाजिक जाणिवांचे धडे गिरवावेत, यासाठी शिक्षकांचे विविध उपक्रम सुरूच होते. मध्यंतरी शेंडा पार्कजवळील वनराई गवत पेटल्याने काळवंडली, होरपळली होती. नागरिकांनी व यंत्रणेने ही झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केला. आता सुरू झालेला वसंत ऋतू म्हणजे झाडांना नवी पालवी येण्याचा काळ असून, या पालवीला हात द्यावा, या उद्देशाने विद्यालयातील सर्व मुले व पालक-शिक्षकांनी सोमवारी झाडांना पाणी घालून सृष्टीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. त्यासाठी महापालिकेने १० हजार लीटरचा पाण्याचा टँकर दिला. विद्यार्थ्यांनी सोबत बादल्या आणल्या होत्या. सर्वांनी साखळी करून सात-आठशे झाडांना पाणी घातले, हे करताना मुलांचा उत्साह तर उदंड होताच; परंतु पालकांनीही सहभाग घेतला. मुलांनी लोकचळवळीत सहभागी होऊन आपले समाजभान जागे ठेवावे, हा यामागचा उद्देश होता. यानंतर मुलांना अभियांत्रिकी छंदाची ओळख करून देत एरो माॅडेलिंगची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
---
फोटो नं २००३२०२१-कोल-सृजन आनंद ०१,०२
ओळ : कोल्हापुरातील सृजन आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साेमवारी शेंडा पार्क येथील होरपळलेल्या वनराईला पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न केला.
--
०३
यावेळी कोल्हापूर एरो माॅडेलर ग्रुपकडून एरो माॅडेलिंगचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
---