अतिक्रमणाच्या नियमितीकरणावरून कुरुंदवाडमध्ये श्रेयवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:37+5:302021-06-30T04:15:37+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड : शहरातील अतिक्रमणे नियमितीकरणावरून नगराध्यक्ष जयराम पाटील आणि विरोधी भाजप नेते रामचंद्र डांगे यांच्यात आरोप ...
गणपती कोळी
कुरुंदवाड : शहरातील अतिक्रमणे नियमितीकरणावरून नगराध्यक्ष जयराम पाटील आणि विरोधी भाजप नेते रामचंद्र डांगे यांच्यात आरोप प्रत्यारोपांनी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेले श्रेयवादाचे राजकारण प्रश्न सोडविण्यासाठी की राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी असा प्रश्न शहरवासियांतून उपस्थित केला जात आहे.
शहरातील सुमारे सातशेवर कुटुंबाचे अतिक्रमण नियमितीकरणाचा प्रश्न आहे. वर्ष अखेरीस पालिकेची निवडणूक होत आहे. त्यातच राज्य सरकारने १९९० पूर्वीचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आधार घेत नगराध्यक्ष जयराम पाटील फाउंडेशनच्यावतीने शहर काँग्रेस अध्यक्ष विजय पाटील यांनी मोठा गाजावाजा करत अतिक्रमण नियमितीकरण करण्यासाठी अतिक्रमण धारकांचे फॉर्म भरून घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत अतिक्रमणधारकांच्या मतावर डोळा ठेवला आहे. तर राज्यमंत्री यड्रावकर समर्थक राष्ट्रवादीनेही अतिक्रमण नियमितीकरण मोहीम राबवली. राजकीय इर्षेतून प्रश्न मार्गी लागेल, अशी अतिक्रमणधारकांची आशा होती. मात्र, सहा महिने उलटले तरी अद्याप कागदोपत्री खेळच सुरू आहेत.
त्यातच अतिक्रमणाबाबतच्या प्रस्तावाला गती मिळाली असून पालिका भूखंडावरील अतिक्रमण नियमितीकरण प्रक्रियेला गती मिळाली असून प्रांताधिकारी विकास खरात यांनी लवकरच व्यापक बैठक बोलावली असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तर विरोधी गटनेते रामचंद्र डांगे यांनी पालिकेने अतिक्रमण जागेच्या मोजणीसाठी अद्याप भूमी अभिलेख विभागाकडे पैसेच भरले नसताना प्रांताधिकारी बैठक कशी घेत आहेत. नगराध्यक्ष पाटील यांनी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करत आहेत. अतिक्रमण नियमित केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू, मात्र फसवणूक झाल्यास अतिक्रमणधारकांना घेऊन नगराध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी अतिक्रमण प्रश्नावरून करत असलेले आरोपांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.