क्रिकेटवेड्यांनो, हे वागणं बरं नव्हं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:55 AM2019-05-14T00:55:08+5:302019-05-14T00:55:15+5:30

चंद्रकांत कित्तुरे हेजीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाणे आमच्या लहानपणी ...

Cricket Players, it was not good! | क्रिकेटवेड्यांनो, हे वागणं बरं नव्हं!

क्रिकेटवेड्यांनो, हे वागणं बरं नव्हं!

Next

चंद्रकांत कित्तुरे
हेजीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाणे आमच्या लहानपणी प्रचंड लोकप्रिय होते. त्यावेळी गावस्कर खेळत असल्याने तेही लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मानवी जीवनाचे सार सांगणाऱ्या या गाण्यावरून महाराष्टÑात क्रिकेट किती लोकप्रिय आहे याचीही साक्ष मिळते. महाराष्ट्रच काय सारा भारतच क्रिकेटवेडा आहे. त्यामुळेच साहेबांचा हा खेळ आपल्या देशात बहरला. प्रचंड व्यावसायिक झाला. श्रीमंत झाला. तीन दशकांपूर्वी यात इतकी श्रीमंती नव्हती. मात्र, आता त्यात प्रचंड पैसा आहे म्हणूनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ बनले आहे.
क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यात आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचाही मोठा वाटा आहे. याच आयपीएलचे १२वे सत्र रविवारी संपले. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी अंतिम सामना हैदराबाद येथे रंगला. हा सामना कोण जिंकणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. दोन्ही संघांचे हजारो समर्थक प्रत्यक्ष मैदानावर आपल्या संघाचा विजय याची देही याचा डोळा पाहण्यासाठी उपस्थित होते, तर लाखो समर्थक दूरचित्रवाणीपुढे या सामन्याचे थेट प्रक्षेपण पहात होते. अपेक्षेप्रमाणे हा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. शेवटच्या षटकात विजय चेन्नईकडे आणि मुंबईकडे हेलकावे खात होता. अखेरच्या शेवटच्या चेंडूवर मलिंगाने चेन्नईच्या फलंदाजाला बाद करत मुंबईला विजय मिळवून दिला अन् मैदानाबरोबरच देशभर एकच जल्लोष सुरू झाला. यात कोल्हापूरकरही मागे नव्हते.
केवळ कोल्हापूर शहरच नव्हे, तर जिल्हाभरातील क्रिकेटशौकिनांनी फटाक्याची आतषबाजी आणि नृत्य करीत जल्लोष केला. कोल्हापुरातील शिवाजी चौकात तर या जल्लोषासाठी तरुणी आणि महिलाही जमल्या होत्या. यावेळी हुल्लडबाजी करणाºया तरुणांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. अशीच परिस्थिती पेठवडगाव येथेही होती. पोलिसांनी पाठलाग करत जल्लोष करणाºया तरुणाईला पांगविले. कोल्हापूरकर फुटबॉलशौकीन म्हणून प्रसिद्ध आहेत. कुस्तीसाठीही कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही इतकी लोकप्रियता आहे. आपल्या आवडत्या संघाचे, खेळाडूचे मनापासून कौतुक करण्यात, त्याच्यावर प्रेम करण्यात कोल्हापूरकरांचा कुणी हात धरू शकणार नाही. क्रिकेटमध्ये मात्र आतापर्यंत भारत-पाकिस्तान सामन्यावेळीच असा जल्लोष पहायला मिळत असे. भारत-पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू असल्याने त्यांच्यातील क्रिकेट सामन्यालाही जणू युद्धाचेच स्वरूप आलेले असते. त्यामुळे त्या सामन्यातील जय-पराजयाचे पडसाद जसे देशात उमटतात तसेच ते कोल्हापुरातही उमटतात.
‘आयपीएल’च्या सामन्यांना लोकप्रियता आहे. क्रिकेटशौकीन हे सामने पाहण्यासाठी न चुकता दूरचित्रवाणीसमोर बसतात, मोबाईलवर पाहतात, रेडिओवर ऐकतात. प्रत्येक संघाचे समर्थक मोठ्या संख्येने असले तरी महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स या संघाचे समर्थक कोल्हापुरात खूप आहेत. ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यानंतर ते मोठ्या संख्येने बाहेर पडून जल्लोष करू लागले. पोलिसांनी त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करताच हुल्लडबाजी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करण्याचा मार्ग अनुसरावा लागला.
क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ मानला जातो. यात कुणी कधी जिंकेल, कधी हरेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच यावर सट्टेबाजीही जोरात चालते. विजयाचे पारडे सतत हेलकावे खात असते. त्यामुळे कमकुवत हृदयाच्या माणसांनी थेट प्रक्षेपण पाहू नये, असा सल्लाही दिला जातो. तरीही शौकीन पाहतात आणि विजयाच्या हर्षवायूने किंवा पराभवाच्या धक्क्याने हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याच्या बातम्या यापूर्वीही ऐकल्या व वाचल्या आहेत. आयपीएलच्या कालच्या सामन्यातही त्याचे प्रत्यंतर आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील एका एकवीस वर्षाच्या तरुणाला रविवारच्या सामन्यावेळी हृदयविकाराचा सौम्य धक्का बसला. या घटनेवरून आपण एखाद्या गोष्टीत किती गुंतायचे याचाही विचार शौकिनांनी करायला हवा.
येत्या तीस तारखेपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत इतर देशांच्या संघांबरोबरच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगेल. त्यावेळीही अशीच चुरस, ईर्षा पहायला मिळेल. मात्र, जल्लोष करताना त्याचा त्रास इतरांना होणार नाही. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.

Web Title: Cricket Players, it was not good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.