गांजाच्या झुरक्यात गुन्हेगारीची ‘नशा’-निर्जन कोपरे बनत आहेत टोळक्यांचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:39 AM2020-06-01T10:39:46+5:302020-06-01T10:41:02+5:30
सकाळी एकत्र यायचे, निर्मनुष्य कोपऱ्यात किंवा एखाद्या पडक्या घरात गांजाचे चार झुरके मारायचे, अंगात नशेची झिंग संचारली की मैदान अगर उद्यान शोधून कुठंतरी निपचीत पडायचे, नाहीतर सैरभैर होऊन गल्लीत किंवा परिसरात हत्यारांसह गोंधळ माजवून एखाद्याचा डाव काढायचा हेच चित्र शहरातील काही भागांत दिसत आहे.
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : लॉकडाऊन काळात एकवेळ जीवनावश्यक वस्तू मिळताना अडचणी येतील; पण नशा चढविणारा गांजा मात्र शहरात सध्या पावलोपावली मिळत आहे. कर्नाटकसह मिरज येथून मोठ्या प्रमाणात गांजा कोल्हापुरात छुप्या मार्गाने येत आहे. त्यामुळे मिसरुडही न फुटलेली युवा पिढी वाया जात आहे. नशेत अनेक मोठे गुन्हे त्यांच्या हातून घडत आहेत. पोलीस यंत्रणाही यात निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे या गांजा विक्रीवर लगाम घालणार कोण, असा प्रश्न उभा राहिला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रोज गांजाची हजारो रुपयांची विक्री होत असल्याचे चित्र आहे, खेळाची मैदाने, निर्जन ठिकाणे, सार्वजनिक उद्याने, उपनगरातील अंतर्गत निर्जन रस्ते ही गांजा ओढत बसण्याची रिकामटेकड्यांची ठिकाणे बनली आहेत. सकाळ झाली की, ठरावीक टोळक्यांचे नियमितपणे येथे गांजाचे झुरके मारण्याचे काम सुरू असते.
गांजाबरोबरच व्हाईटनर, बॉँड, गोगा या पदार्थांचाही दाहक अशा नशेसाठी वापर केला जातो. चार झुरके मारले की, अंगात नशेची झिंग चढते, निर्जनस्थळीच निपचीत पडायचे नाहीत, तर हत्यारांसह गोंधळ माजवायचा, वाहनांची तोडफोड करायची हाच यांचा उद्योग. गांजाची झिंग चढल्यानंतर आपण काय करतो हे त्यांनाच समजत नाही. दौलतनगरात वारंवार होणारे हल्ले, वाहने पेटविणे, आदी प्रकार त्यातूनच घडत आहेत.
येथील ठिकाणी कारवाई कधी?
उद्यान, कठड्यावर, फूटपाथवर अनेक नशेखोर पडलेले दिसतात. याशिवाय पंचगंगा स्मशानभूमी घाट, हुतात्मा पार्क, टाऊन हॉल उद्यान, निर्माण चौक, गोळीबार मैदान, राजाराम बंधारा, लाईन बाजार परिसरात त्र्यंबोली लॉन, आदी ठिकाणी खुलेआम नशेबाज टोळकी गांजाचे झुरके मारताना दिवसभर असतात.
कर्नाटक सीमाहद्द, मिरजमार्गे कोल्हापूर
कर्नाटक सीमाभागातील निपाणी, गळतगा, चिक्कोडीमार्गे मिरज येथील खाजा वस्ती येथे हा गांजा मोठ्या प्रमाणावर येतो. तेथून कोल्हापूर ते मिरज रेल्वेतून काही युवक रोज रेल्वेने सकाळी कोल्हापुरात येऊन दिवसभर काही ठिकाणी गांजा मोठ्या प्रमाणात देऊन पैसे घेऊन सायंकाळी निघून जातात. हे गेली कित्येक वर्षे सुरू असतानाही पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत.
याशिवाय सीमाभागातील गडहिंग्लज तालुक्यात बुगडीकट्टी, मुत्नाळ, बसर्गे, हलकर्णी, नांगनूर, खानदाळ या ठिकाणी शेतात इतर पिकांमध्ये काही सरीमध्ये छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली जात आहे, तसेच त्याची विक्री करणारे मोजकेच एजंट आहेत. लॉकडाऊन काळातही अत्यावश्यक सेवेच्या वाहनातून छुप्या पद्धतीने हा गांजा नियमितपणे पुरविला जातो.
पंचनामे कसले ?
महापूर येऊन गेल्यानंतर शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यासाठी पूर ओसरल्यानंतर कृषी अधिकारी, कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत प्रत्येक शेतीच्या जागेवर जाऊन पंचनामे केले जातात; पण आजपर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करताना गांजाची शेती असल्याचे कोठेही आढळल्याचे उदाहरण नाही अगर त्यांच्यावर कारवाई केलेले कोठेही दिसून आलेले नाही.
- जिल्ह्यात वर्षाला 80 गुन्हे दाखल होतात
- कोल्हापुरात 8 ठिकाणी गांजा विक्री होते-
- सीमाभागातील 3 गावातून गांजाची आवक
- सीमाहद्दीत 6 अंतर्गत गावांत गांजा शेती