आनंदराव पाटील यांच्यावर गुन्हा
By Admin | Published: June 11, 2015 10:52 PM2015-06-11T22:52:53+5:302015-06-12T00:34:59+5:30
लाल दिव्याचा गैरवापर : न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद नसताना पदाचा दुरुपयोग, तसेच लेटरपॅड आणि लालदिव्याचा गैरवापर केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील यांच्यावर गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
काही दिवसांपूर्वी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना आनंदराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
‘कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद नसताना आनंदराव पाटील यांनी तसे भासवून शासनाच्या विविध सोयी-सवलतींचा लाभ घेतला तसेच खोट्या पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याचा प्रयत्न केला,’ अशी दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांद्वारे फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता.
मोरे यांच्या वतीने अॅड. चंद्रकांत बेबले यांनी काम पाहिले होते. याबाबत सखोल चौकशी करून पाटील यांना योग्य शासन व्हावे, या फिर्यादीची दखल घेऊन पाटील यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एस. नेवसे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आनंदराव पाटील यांच्याविरोधात गुरुवारी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक बुरसे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
तब्बल अकरा कलमांचा समावेश
आनंदराव पाटील यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तब्बल अकरा विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७०, १७१ (तोतयागिरी) १८८, १९७, (खोटा पत्रव्यवहार करणे), ४०६, ४१५, ४२० (फसवणूक), ४६५, ४६७,४७१ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४०९ (लोकप्रतिनिधीकडून फसवणूक) या कलमांचा त्यामध्ये समावेश आहे.