बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या प्रशांत हारगेवर मिरजेतही गुन्हे
By admin | Published: January 7, 2015 12:54 AM2015-01-07T00:54:08+5:302015-01-07T00:54:59+5:30
मिरजेत पकडल्याने बनावट दाखल्यांसाठी निवडले कोल्हापूर कार्यक्षेत्र
मिरज : कोल्हापुरात बनावट जात वैधता प्रमाणपत्रप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत हारगे याने मिरजेतही अशीच फसवणूक केली आहे. सेतू कार्यालयात दाखले मिळवून देणारा एजंट म्हणून काम करणाऱ्या हारगेवर मिरजेत जातीच्या दाखल्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. मिरजेत पकडला गेल्याने त्याने कोल्हापूर कार्यक्षेत्र निवडून बनावट दाखल्यांचा उद्योग सुरू केल्याचे पोलिसांच्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे.
मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रशांत हारगे याने पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मिरजेत सेतू कार्यालयात दाखले मिळवून देणारा एजंट म्हणून काम सुरू केले. गरजूंना जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी चांगले पैसे मिळत असल्याने सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हारगे याचा जातीचे दाखले मिळवून देण्याचा उद्योग सुरू होता. कागदपत्रे अपूर्ण असल्यास जातीचा दाखल मिळत नसल्याने दाखल्यासाठी बनावट कागदपत्रे, बनावट पुरावे तयार करून देत होता. मिरजेत जातीच्या दाखल्यासाठी एका प्रकरणात बनावट सात-बारा हजर केल्याने त्याच्यावर पाच वर्षांपूर्वी मिरज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटका झाल्यानंतर हारगेने कार्यक्षेत्र बदलले व कोल्हापूर जात पडताळणी कार्यालयात एजंट म्हणून काम सुरू केले.
जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास असलेल्या हारगेने मल्लेवाडीतील समीर जमादार याच्या मदतीने स्कॅनर व प्रिंटरचा वापर करून बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यास सुरूवात केली. जात पडताळणी कार्यालयातील काही कर्मचारी बनावट प्रमाणपत्रांसाठी त्याला ग्राहक मिळवून देत होते. त्यांच्याशी संगनमताने त्याने अनेकांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
पोलीस कारवाईनंतर नव्या ठिकाणी उद्योग
त्याच्या दस्तगीर नावाच्या अन्य एका साथीदाराने मिरज परिसरात अनेकांना बनावट जातीचे दाखले दिल्याची माहिती मिळाली. तसेच त्याने एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली होती. या प्रकरणातही पोलीस कोठडीत जाऊन आल्यानंतर त्याचा बनावट प्रमाणपत्रांचा व्यवसाय सुरूच आहे. पोलीस कारवाई झाली की, पुन्हा नव्या ठिकाणी बनावट दाखले देण्याचा उद्योग सुरू करण्याची त्याची पध्दत आहे.