महाबळेश्वरात हॉर्स अँड पोनी असोसिएशनच्या अध्यक्षावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:10 PM2017-10-23T14:10:14+5:302017-10-23T18:11:01+5:30
हळूवारपणे घोडा चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हॉर्स अँड पोनी असोसिएशनचा अध्यक्ष जावेद खारखंडे याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर : हळूवारपणे घोडा चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हॉर्स अँड पोनी असोसिएशनचा अध्यक्ष जावेद खारखंडे याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिवाळी सुटीमुळे महाबळेश्वर गेल्या आठ दिवसांपासून पर्यटकांनी बहरून गेले. या गर्दीवर तसेच वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे काम पोलिस प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.
रविवारी रात्री पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे पोलिस पथकासह पेट्रोलिंग करीत होते. यावेळी माखरीया गार्डनपासून वेण्णा तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पाहणी केली असताना जावेद खारखंडे हा पर्यटकांना घोड्यांवर बसवून हळूवारपणे जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक संथ गतीने सुरू होती. हे घोडे बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
दरम्यान, रहदारीच्या मार्गावर वन्यप्राण्यांना आणणे व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी खारखंडे याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात कलम २८९ अन्वये गुन्हा दाखल केला.
काय आहे २८९ कलम
वन्यप्राण्यांचा वावर सार्वजनिक ठिकाणी धोक्याचा होणार नाही, याची आवश्यक खबरदारी प्राणी हातळणारे किंवा त्याच्या मालकाने घेणे बंधनकारक आहे. खबरदारी न घेणे, मनुष्याला हानी पोहोचविण्याची स्थिती उद्भविणे तसेच प्राण्याला इजा झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यांतर्गत सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपयांचा दंड अथवा दोन्हीही अशी कायद्यात शिक्षेची तरतूद आहे.
प्रशासनाचा घोडे व्यावसायिकांना विरोध नाही. मात्र, पालिकेने निर्धारित केलेल्या जागेतच त्यांनी आपला व्यवसाय करावा. सार्वजनिक ठिकाणी कोणीही घोडे चालवू नये. अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- दत्तात्रय नाळे,
पोलिस निरीक्षक