हसूरवाडीच्या सरपंचांसह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:42+5:302021-02-11T04:27:42+5:30

गडहिंग्लज : अ‍ॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन १ लाख ११ हजार रुपये उकळल्याप्रकरणी दशरथ वाघराळकर, श्रीकांत जाधव, सरपंच ...

Crime against three including Sarpanch of Hasurwadi | हसूरवाडीच्या सरपंचांसह तिघांविरुद्ध गुन्हा

हसूरवाडीच्या सरपंचांसह तिघांविरुद्ध गुन्हा

Next

गडहिंग्लज : अ‍ॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन १ लाख ११ हजार रुपये उकळल्याप्रकरणी दशरथ वाघराळकर, श्रीकांत जाधव, सरपंच संजय कांबळे (सर्वजण रा. हसूरवाडी, ता. गडहिंग्लज) या तिघांविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, हसूरवाडी येथील अंकुश गोरे हे उत्तराखंड येथे भारत-तिबेट सीमा पोलीस दलात सेवेत आहेत. ऑगस्टमध्ये ते रजेवर गावी आले होते. कोरोनामुळे त्यांची कोविड चाचणी करून त्यांना १३ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले होते.

तथापि, गावातील काही लोकांना १३ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच घरी सोडण्यात आल्याचे समजल्यामुळे गोरे यांनी त्याबाबत वाघराळकर यांच्याकडे फोनवरून विचारणा केली. तेव्हा अपशब्द वापरल्याच्या कारणातून दोघांत वाद झाला.

वाद मिटविण्यासाठी वाघराळकर, जाधव व कांबळे यांनी संगनमत करून गोरे यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले, तर तुझी नोकरी जाईल, अ‍ॅट्राॅसिटीची केस करेन, अशी धमकी दिली आणि त्यांच्याकडून त्यांनी १ लाख ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

अंकुश गोरे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे अधिक तपास करीत आहेत.

-----------------------

यासंदर्भात सरपंच संजय कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, कोरोना काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता गावकऱ्यांची सेवा करणाऱ्या परिचारिकेला गोरे यांनी भ्रमणध्वनीवरून अश्लील शिवीगाळ केली. त्याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी आपल्यालाही शिवीगाळ करून मारहाण केली. परंतु, गावातील सामाजिक सलोख्याला तडा जाऊ नये म्हणून आपण त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली नव्हती. त्याचाच गैरफायदा घेऊन त्यांनी खोटी फिर्याद देऊन आपल्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण पोलीस उपअधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Crime against three including Sarpanch of Hasurwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.