अपघातातील मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:23+5:302021-09-08T04:29:23+5:30
कोल्हापूर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अमोल ...
कोल्हापूर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अमोल गुंडा माळवी (वय २९ रा. वाळोली, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी कोल्हापूर ते गगनबावडा रोडवर दोनवडे (ता. करवीर) येथे झालेल्या दुर्घटनेत आणखी दोघे जखमी झाले होते. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी करवीर पोलिसात सौरभ सुरेश जगदाळे (वय २३ रा. शास्त्रीनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सौरभ जगदाळे हा आपला मित्र मयूर बाळासाहेब इंगवले (रा. जवाहरनगर) याला दुचाकीवरून बसवून गगनबावडाहून कोल्हापूरकडे येत होते. नीलेश गुंडा माळवी व त्याचा भाऊ अमोल माळवी (रा. वाळोली, ता. पन्हाळा) हे दोघे गगनबावडाच्या दिशेने जात होते. दोन्हीही वाहनाची समोरासमोर धडक झाली. अपघातात अमोल माळवी हा रस्त्यावर पडला, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. अपघातात माळवीसह मयूर व चालक सौरभ हे जखमी झाले. त्याबाबत हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सौरभ जगदाळे याच्यावर सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.