क्राईम संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:26+5:302021-01-14T04:19:26+5:30
कोल्हापूर : राजारामपुरीतील तेरावी गल्लीतील अपूर्वा टाॅवरमध्ये उभी केलेली सायकल अज्ञात चाेरट्याने लंपास केली. याबाबतची तक्रार अथर्व महेश जोशी ...
कोल्हापूर : राजारामपुरीतील तेरावी गल्लीतील अपूर्वा टाॅवरमध्ये उभी केलेली सायकल अज्ञात चाेरट्याने लंपास केली. याबाबतची तक्रार अथर्व महेश जोशी (३०, राजारामपुरी तेरावी गल्ली) यांनी मंगळवारी पोलिसांत दिली.
तक्रारदार अथर्व यांनी आपल्या ताब्यातील सायकल साेमवारी रात्री राहत्या अपार्टमेंटच्या खालील पार्किंगमध्ये उभी केली होती. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ती जागेवर दिसली नाही. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केली. याबाबतचा तपास सहायक फौजदार नलवडे हे करीत आहेत.
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी
कोल्हापूर : बालिंगा ते कोल्हापूर रस्त्यावर सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बंद पडलेली दुचाकी ढकलत नेत असताना कोल्हापूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या धडकेत एकजण जखमी झाला. इंद्रजित वसंत गवळी (३२, शिवभक्ती काॅलनी, राजोपाध्येनगर) असे जखमीचे नाव आहे. इरेश बसप्पा कमदरी (रा. बालिंगा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी करवीर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार गवळी हे बालिगांहून कोल्हापूरकडे बंद पडलेली दुचाकी ढकलत नेत होते. यादरम्यान कोल्हापूरहून आलेल्या संशयित कमदरी याने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून जोराची धडक दिली. यात तक्रारदार गवळी हे जखमी झाले व दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलिसांनी संशयित कमदरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हेड काॅन्स्टेबल कांबळे हे तपास करीत आहेत.
सीपीआर चौकात दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार जखमी
कोल्हापूर : सीपीआर चौक ते पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर टाऊन हाॅलजवळून सायकलवरून जाणाऱ्या पंधरा वर्षीय युवकास अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. यात अल्पवयीन सायकलस्वार जखमी झाला. जखमीचे वडील सचिन शशिकांता शहा (नागाळा पार्क) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारदार शहा यांचा मुलगा ओम हा सीपीआर चौकातून पंचगंगा नदीकडे सायकलवरून जात होता. यादरम्यान अज्ञात दुचाकीस्वाराने त्याला धडक दिली. यात तो खाली पडल्याने त्याचा हातास दुखापत झाली. जखमी अवस्थेतील ओम यास रुग्णालयात घेऊन न जाता तसेच पोलिसांना अपघाताची वर्दी न देता परस्पर निघून गेलेबाबत शहा यांनी तक्रार दिल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबतचा तपास पोलीस काॅन्स्टेबल खरात हे करीत आहेत.