‘रिलायन्स’च्या व्यवस्थापकावर गुन्हा
By admin | Published: November 8, 2015 11:18 PM2015-11-08T23:18:26+5:302015-11-08T23:35:01+5:30
या कंपनीमार्फत विजयदुर्ग गगनबावडा कोल्हापूर मार्गाच्या बाजूने फोर जी केबल टाकण्यात येत आहे.
वैभववाडी : रिलायन्सची फोर जी केबल टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता व साईडपट्टी खोदून अतिक्रमण व नुकसान केल्याच्या आरोपावरून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे व्यवस्थापक आप्पासाहेब बापूसाहेब भोसले यांच्याविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शैलेश मोरजकर यांनी गुरुवारी रात्री तक्रार दिली होती. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (मेहकर चेंबर, नरिमन पॉईंट) या कंपनीमार्फत विजयदुर्ग गगनबावडा कोल्हापूर मार्गाच्या बाजूने फोर जी केबल टाकण्यात येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची आगाऊ परवानगी कंपनीने घेतली आहे. परंतु, वैभववाडीपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर करूळ येथे जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. तसेच रस्त्यालगत साईडपट्टी खोदून सार्वजनिक बांधकाम विभागाचे नुकसान व अतिक्रमण केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना न देता केबल टाकण्यासाठी दिलेल्या परवान्यातील अटी व शर्थींचे उल्लंघन करून अतिक्रमण आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शैलेश मोरजकर यांनी पोलिसात दिली होती. त्यानुसार भादंवि कलम ४३१, ४४२, ४२७ अन्वये कंपनीचे व्यवस्थापक आप्पासाहेब भोसले यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवा शिवगण करीत
आहेत. (प्रतिनिधी)
बांधकामला आली जाग
मे २0१५ पासून तळेरे ते गगनबावडा दरम्यान रिलायन्सची केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्य महामार्गालगत खोदलेल्या चरात नाधवडे येथे जनावरे तसेच ठिकठिकाणी वाहने रुतल्याने नुकसान झाले. मात्र, संबंधितांनी वेळोवेळी तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नव्हते. परंतु रस्ता खोदल्यानंतर आता बांधकामला तब्बल सहा महिन्यानंतर जाग आली आहे.