कोल्हापूर जिल्ह्यात ४८ संस्थांत ७५ कोटींचा अपहार तीनशेहून अधिक जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:41 AM2018-09-06T00:41:39+5:302018-09-06T00:42:27+5:30
‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ४८ सहकारी संस्थांमध्ये तब्बल ७५ कोटींचा अपहार झाला आहे.
राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : ‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ४८ सहकारी संस्थांमध्ये तब्बल ७५ कोटींचा अपहार झाला आहे. यामध्ये बॅँका, पतसंस्था व विकाससंस्थांची संख्या लक्षणीय असून, या संस्थांशी संलग्न ३०० हून अधिक जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. लेखापरीक्षकांकडून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले; पण वसुलीची प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी सहकाराची चळवळ राज्यात बळकट केली; पण खºया अर्थाने कोल्हापुरातील कर्तृत्ववान नेतृत्वामुळे येथे सहकार रुजला आणि फोफावलाही. सहकारामुळे विशेषत: साखर कारखाना, दूध संघ, विकास संस्था, पतसंस्थांमुळे जिल्ह्याचे अर्थकारण भक्कम झाले. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला उभे करण्याचे काम सहकाराने केले, हे कोणीही नाकारू शकत नाही; पण सहकारात ‘स्वाहा’कार घुसल्याने अनेक वित्तीय संस्था डबघाईला आल्या. अपहारामुळे संस्था अडचणीत आल्या.
लेखापरीक्षणात अपहार उघडकीस आल्यानंतर लेखापरीक्षकांनी तत्काळ निबंधकांची मान्यता घेऊन गुन्हा नोंद करायचा असतो; पण अनेकवेळा लेखापरीक्षकच गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करतात. एस. के. पाटील बॅँकेच्या बाबतीत असेच घडले. अपहार स्पष्ट झाला; पण संचालकांवर कारवाई करण्याबाबत लेखापरीक्षकांनी कानाडोळा केला. ठेवीदार संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले.
गेल्या पाच वर्षांत शंभरहून अधिक संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे झाले; पण त्यांतील अपहाराची रक्कम न भरल्याने ४८ संस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या ४८ संस्थांमध्ये सर्वाधिक चार वेळा शेतकरी संघाच्या विविध शाखांमध्ये कर्मचाºयांनी अपहार केले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. गडहिंग्लजच्या शिवाजी बॅँकेच्या संचालकांवर १३ कोटी ३१ लाखांच्या अपहाराबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. अलीकडेच एस. के. पाटील बॅँकेच्या संचालकांवर
१७ कोटींच्या अपहाराबद्दल गुन्हे दाखल केले आहेत.
मोठा अपहार आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे
तीन कोटींपर्यंत अपहार असेल तर संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करता येतात; पण त्यापेक्षा जास्त अपहार असेल तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अभिप्राय घ्यावा लागतो.
शेतकरी संघात सर्वाधिक अपहार
गेल्या पाच वर्षांत शेतकरी संघाच्या चार शाखांत अपहार झालेले आहेत. ‘नर्सरी’, ‘टिंबर मार्केट’, ‘पडळ’ या शाखांत आतापर्यंत नऊ लाख ८५ हजारांचा अपहार झाला आहे.
संबंधित कर्मचाºयांवर गुन्हेही दाखल झालेले आहेत.
पाच वर्षांतील अपहार झालेल्या संस्थांची संख्या
प्रमुख संस्था (कंसात अपहाराची रक्कम )
शेतकरी संघ नर्सरी शाखा (८२ हजार ६७५ रुपये),
टिंबर मार्केट शाखा (३ लाख ५५ हजार)
रत्नाप्पाण्णा कुंभार हौसिंग (६ लाख ९८ हजार)
एस. के. पाटील बॅँक (१७ कोटी),
साधना बॅँक, इचलकरंजी (११.५४ लाख),
शेतकरी संघ पडळ शाखा (३.७८ लाख)
शेतकरी संघ पडळ शाखा (१ लाख ६९ हजार)
शिवाजी को-आॅप. बॅँक, गडहिंग्लज (१३ कोटी ३१ लाख)