Kolhapur: कोल्हापुरात चंबुखडी परिसरात पाच घरफोड्या, करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:29 PM2023-03-26T21:29:16+5:302023-03-26T21:29:55+5:30
Crime News: चंबुखडी परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमापासून जवळच असलेल्या आनंद कॉलनी आणि शालिनीताई कॉलनीत चोरट्यांनी पाच घरांमध्ये चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
- उद्धव गोडसे
कोल्हापूर : चंबुखडी परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमापासून जवळच असलेल्या आनंद कॉलनी आणि शालिनीताई कॉलनीत चोरट्यांनी पाच घरांमध्ये चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार रविवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आला. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंबुखडी परिसरात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या केल्या. रविवारी सकाळी काही घरांच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तुटलेल्या स्थितीत दिसल्यावर परिसरातील नागरिकांनी घरमालकांना फोन करून माहिती दिली. दामोदर आनंदराव गुरव (वय ५३, मूळ रा. पोहाळे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा, सध्या रा. आनंद कॉलनी, चंबुखडी, कोल्हापूर) यांचे घर गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. त्यांना सकाळी एका शेजाऱ्याने फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर गुरव यांनी घराकडे धाव घेऊन पाहणी केली असता, चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आतील सर्व कपाटांमधील साहित्य विस्कटून सुमारे १५ हजार रुपयांच्या चांदीच्या मूर्ती आणि नाणी लंपास केल्याचे लक्षात आले.
गुरव यांनी करवीर पोलिसांना फोन करून चोरीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता परिसरात पाच घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याचे समजले. त्यापैकी बहुतांश घरमालक परगावी असल्याने चोरट्यांना नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लांबवला याची माहिती मिळू शकली नाही. दामोदर गुरव यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत फिर्याद देण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते. एकाच रात्रीत पाच ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.