विशाळगड जाळपोळप्रकरणी संभाजीराजेंसह ५०० जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 12:23 PM2024-07-17T12:23:12+5:302024-07-17T12:24:12+5:30

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर ) येथील अतिक्रमण काढताना जाळपोळ, हिंसाचार केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे, हिंदू बांधव ...

Crimes against 500 people including Sambhaji Raj in Vishalgad arson case | विशाळगड जाळपोळप्रकरणी संभाजीराजेंसह ५०० जणांवर गुन्हे

विशाळगड जाळपोळप्रकरणी संभाजीराजेंसह ५०० जणांवर गुन्हे

कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील अतिक्रमण काढताना जाळपोळ, हिंसाचार केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे, हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह ५०० हून अधिक जणांवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला रविवारी (दि.१४) हिंसक वळण लागले. त्यामध्ये गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये मुस्लीम समाजाच्या घरांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी सोमवारी २१ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण घटनेला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संभाजीराजे, पुण्यातील रवींद्र पडवळ यांच्यासह ५०० हून अधिक जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या घटनेत सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दरम्यान, खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी विशाळगडाजवळील गजापूर येथे जात नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आम्हाला पोटाशी धरले, जमिनी दिल्या, त्यांच्या वारसाने जमाव गोळा करावा आणि आमचा काहीच दोष नसताना, भीतीने गप्प घरात बसलो असताना आमचे जगणेच उद्ध्वस्त करावे याबद्दलचा उद्वेग मुस्लीम समाजाने त्यांच्यासमोर व्यक्त केला.

१०० मिळकतींचे अतिक्रमण काढले

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, गेल्या दोन दिवसांत १०० मिळकतींचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. कारवाईनंतर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, मलबा खाली आणला जाईल. पावसाळा असल्याने रहिवासी अतिक्रमण काढले जाणार नाही. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढले जात आहे. काही जणांनी स्वत:हून त्यासाठी मदत केली आहे.

शांततेला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

मुंबई : विशाळगडावरचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात हे कायद्याने झाले पाहिजे, नियम पाळून झाले पाहिजे ही सरकारची भावना आहे. त्यामुळे तशा पद्धतीने कारवाई होईल. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी करता येईल, याला आमची प्राथमिकता आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

Web Title: Crimes against 500 people including Sambhaji Raj in Vishalgad arson case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.