बोंद्रेनगरातील गुन्हे जलदगती न्यायालयाकडे

By Admin | Published: March 3, 2017 12:32 AM2017-03-03T00:32:03+5:302017-03-03T00:32:03+5:30

विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती : मृत गीता बोडेकरच्या घरी भेट; पोलिस चौकी लवकरच सुरू करणार

Criminal Court in Bondarengan | बोंद्रेनगरातील गुन्हे जलदगती न्यायालयाकडे

बोंद्रेनगरातील गुन्हे जलदगती न्यायालयाकडे

googlenewsNext

कोल्हापूर : बोद्रेंनगर धनगर वसाहत परिसरातील आत्महत्येस बळी पडलेल्या पल्लवी बोडेकर व गीता बोडेकर या दोन्ही गुन्ह्यांतील संशयितांना लवकर शिक्षा होण्यासाठी हे दोन्ही गुन्हे जलदगती न्यायालयाकडे देण्यास तपासधिकाऱ्यांना सांगितले आहे. यासाठी विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
बोंद्रेनगर परिसरातील पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे राहणाऱ्या गीता बोडेकर (वय १९)हिने तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या कुटुंबीयाची गुरुवारी नांगरे-पाटील यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी घरी भेट घेतली. मृत गीताचे वडील हरी बोडेकर व तिची आई विठाबाई यांनी ‘गीता’चा बळी घेणाऱ्या संशयिताला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. कोणत्याही स्थितीत गीताला न्याय मिळवून देणारचं, आणखी कोणी त्रास देत असेल तर सांगा, मला थेट भेटा अथवा संपर्क करा, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी, गंगाई लॉन येथे महिला सुरक्षिततेतील उपाययोजनांबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
नांगरे-पाटील म्हणाले, ‘मी तुमचा भाऊ आहे, तुम्हाला काय समस्या असतील, कोण त्रास देत असेल तर आम्हाला सांगा, तुम्ही अत्याचार सहन करू नका’, ‘तुम्ही निर्भय बना, पुढे या आणि धाडस दाखवा, निश्चितच तुम्हाला न्याय दिला जाईल. आता बोंद्रेनगर परिसरासाठी एक आदर्श योजना तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राधान्यक्रम हा येथील पोलिस चौकी तयार करण्यासाठी राहणार आहे. पुढील महिन्यात पोलिस भरती आहे. त्यामुळे या भागात ज्या मुली १२ वी पास झाल्या आहेत, त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाईल, तसे भरतीत प्राधान्य दिले जाईल तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंप्रशिक्षण तीन दिवस देणार आहे. निर्भया पथकातील महिला अधिकारी, कॉन्स्टेबलांना छुपे कॅमेरे देणार आहोत. या छुप्या कॅमेऱ्यांतूनचा पुरावे मिळण्यास मदत उपयोग होणार आहे. पल्लवी व गीता बोडेकर या दोन्ही मुलींच्या आत्महत्या प्रकरणातील संशयितांना तडीपार करण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहे.
एम. बी. तांबडे म्हणाले, महिलांवरील अत्याचार विरोधात निश्चितच उपाययोजना केल्या जातील. करवीरचे पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार, अ. भा. मराठा महासंघाचे वसंत मुळीक, प्रा. एन. डी. बोडके, अर्चना बोडेकर, तेजस्विनी बोडके, दीपाली आडूळकर यांची भाषणे झाली. बैठकीस पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, मुल्ला, नगरसेविका रिना कांबळे, विजय देसाई, बाबूराव आडूळकर, अंजली बोडेकर, सीताराम बोडेकर उपस्थित होते.


बोंद्रेनगरात ‘निर्भया पथक’ कार्यरत ठेवा
बोंद्रेनगरात तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून दोन मुलींनी नुकत्याच आत्महत्या केल्या आहेत. अशा घटनांची या परिसरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी या परिसरात निर्भया पथक कार्यरत ठेवून, सातत्याने येथील तरुणींशी संपर्क ठेवावा, अशी मागणी एकटी संस्थेने गुरुवारी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, बोंद्रेनगरातील हे तरुण तरुणींच्या आई-वडिलांसमोर मुलींची छेड काढण्यास घाबरत नाहीत. पोलिसांनी कारवाई केली तरी त्यांना जरब बसत नाही, त्यामुळे अशा तरुणांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. यावेळी शिष्टमंडळास या परिसरात पोलिसांची गस्त वाढविणार आहोत, तसेच येथील तरुणींना निर्भय बनविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही सुहेल शर्मा यांनी दिली. या शिष्टमंडळात ‘एकटी’चे उपाध्यक्ष संजय पाटील, डॉ. मंजुळा पिशवीकर, जयश्री कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर, पुष्पा पठारे, फ्रान्सिस्का डिसूझा, वनिता कांबळे, पुष्पा कांबळे, सविता कांबळे व कोमल कांबळे यांचा समावेश होता.


कोल्हापूर जिल्ह्यातील बोंद्रेनगर परिसरामधील आत्महत्येस बळी पडलेली गीता बोडेकर हिच्या कुटुंबियांची गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, एम. बी. तांबडे यांनी भेट घेतली. त्यावेळी मृत गीताची आई विठाबाई बोडेकर यांनी त्यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. यावेळी नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: Criminal Court in Bondarengan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.