परजिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:50 AM2018-03-12T00:50:55+5:302018-03-12T00:50:55+5:30
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खून, लूटमार, चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल असणाºया पुणे, सातारा, सांगली, कर्नाटकातील गुन्हेगारांच्या टोळ्या काही दिवसांपासून कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा जबरी लूटमारीच्या घटना घडू लागल्याने शहर असुरक्षित बनले आहे.
शहरात महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना आता चोरांनी वृद्धांना लक्ष्य केले आहे. मोटारसायकलीवरून भरधाव वेगाने येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याची नवीन पद्धत कोल्हापुरात सुरू केली आहे. गुन्ह्यांची पद्धत मुंबई-पुण्यातील गुन्ह्यांसारखी असून तेथील बहुतांश गुन्हेगार कोल्हापुरात आले आहेत. पुणे, सांगली, सातारा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळक्यांना ‘सळो की पळो’ करून सोडल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांना चकवा देत या टोळ्या कोल्हापुरात वास्तव्यास आल्याची गोपनीय माहिती पोलिसांकडे आली आहे. स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून या टोळ्यांनी जवाहरनगर, राजेंद्रनगर, वारे वसाहत, सदर बझार, शाहूनगर, दौलतनगर, टाकाळा, आदी परिसरात वास्तव्य केले आहे. काही गुन्हेगारांचा हॉटेल-लॉजवर मुक्काम आहे. पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी सुरू असल्याने सर्व पोलीस अपुरी कामे पूर्ण करण्याच्या धांदलीत आहेत. त्यामुळे पेट्रोलिंग, रात्रगस्तीचे प्रमाण कमी झाल्याने लूटमारीच्या घटना वाढल्याची चर्चा नागरिकांत आहे.
तोतया पोलीस सापडेनात
रुईकर कॉलनी येथे शिवाजी महादेव लायकर (वय ६४, रा. एल.आय.सी. कॉलनी, रुईकर कॉलनी परिसर) यांचे साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दानिगे, आपटेनगर येथे शिवाजी दत्तात्रय साठे (६७, रा. राधेयनगरी, आपटेनगर) यांची सोन्याची चेन पोलीस असल्याची बतावणी करून लंपास केली. अमित कांबळे या भामट्याने पोलीस असल्याची बतावणी करून शाहूपुरीतील हॉटेलमालकाला सतरा हजाराला गंडा घातला. हे तोतया पोलीस मोकाट असून ते अद्यापही सापडलेले नाहीत.
दोन महिन्यांत ५० दुचाकींची चोरी
घरासमोर, बसस्थानक, महाद्वार रोड यांसह दुकानच्या दारात पार्किंग केलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. बनावट चावीचा वापर करून दिवसाढवळ्या दुचाकी लंपास केल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यांत ५० दुचाकी चोरीची नोंद पोलीस दप्तरी आहे. चोरीनंतर या दुचाकी कमी किमतीत विना कागदपत्रांद्वारे विक्री केली जाते. तसेच जुन्या दुचाकी स्क्रॅप करून त्यांचा नंबर लावून त्या वापरल्या जातात. काही दुचाकींचे स्पेअरपार्ट काढून ते विक्री केले जातात.
नियमबाह्य वाहनधारकांवर आजपासून कारवाई होणार
वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत आज, सोमवारपासून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करणार आहे. पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे हे स्वत: रस्त्यावर उतरून अशा वाहनचालकांना दणका देणार आहेत. चौका-चौकांत प्रत्येक दुचाकी, चारचाकी तपासली जाणार आहेत. यावेळी परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट,‘दादा’,‘मामा’, अशा फॅशनेबल नंबरप्लेट लावणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.