अपघात झाल्यास ठेकेदारावर फौजदारी गुन्हा, आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:39 AM2020-06-09T10:39:07+5:302020-06-09T10:40:44+5:30
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत महापौर निलोफर आजरेकर यांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी खुदाई केलेली आहे ती कामे प्राधान्याने करुन घ्यावीत, अन्यथा काही दुर्घटना घडल्यास ठेकेदारास जबाबदार धरून फौजदारी दाखल केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
कोल्हापूर : अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत महापौर निलोफर आजरेकर यांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी खुदाई केलेली आहे ती कामे प्राधान्याने करुन घ्यावीत, अन्यथा काही दुर्घटना घडल्यास ठेकेदारास जबाबदार धरून फौजदारी दाखल केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
ठेकेदाराला केलेल्या कामाचे रिस्टोलेशन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेही काम कंपनीने पूर्ण केले नाही. लॉकडाऊनच्या काळात मुख्य रस्त्यावरील काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेही काम लॉकडाऊन संपला तरी सुरू करण्यात आलेले नाही, याकडे महापौरांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
जलअभियंता भास्कर कुंभार यांनी अमृत योजनेचे काम शहरात फक्त चार ठिकाणी सुरू असून, ते काम प्रगतीपथावर असल्याचे दिसत नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन यांनी अमृत योजनेचे काम मंदगतीने सुरू असल्याचे सांगितले.
पावसाळ्यापूर्वी टाक्यांची कामे ग्राऊंड लेव्हलला आली असती तर पावसाळ्यात कामे करता आली असती. याबाबत कंपनीला वारंवार सृूचना दिलेल्या आहेत. कामाची मुदत ऑगस्टपर्यंत आहे. कामाची प्रगती २५ टक्के आहे. बैठकीला स्थानिक मॅनेजरऐवजी कंपनीच्या जबाबदार व्यक्तीस बोलावून त्यांच्याबरोबर चर्चा करावी, अशी स्पष्ट सूचना महाजन यांनी केली.
आयुक्त कलशेट्टी यांनी कामाचा प्राधान्यक्रम ठरवून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत, अशा सूचना ठेकेदाराच्या प्रतिनिधीला केल्या. ठेकेदार असिस्टंट मॅनेजर संजय जोशी यांनी चार दिवसांत लेबर येत असून कामाची गती वाढवू, असे सांगितले.
यावेळी स्थायी सभापती संदीप कवाळे, अशोक जाधव, राहुल चव्हाण, प्राधिकरणाचे उपअभियंता अजय साळोखे, एस. व्ही. जानवेकर, उपजल अभियंता रामदास गायकवाड, राजेंद्र हुजरे, एन. एस. सुरवसे, कनिष्ठ अभिंतया संजय नागरगोजे, नोबेल कन्ट्रक्शनचे कनिष्ठ अभियंता सुशील पाटील उपस्थित होते.
- ११४ कि.मी. पैकी ५४ कि.मी.जलवाहिनीचे काम पूर्ण
- ५४ कि. मी. पैकी ४७ कि.मी. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण .
- बारा टाक्यांपैकी दोन टाक्यांचे काम सुरू.