हिरण्यकेशी प्रदूषित करणाऱ्यांवर फौजदारी करा
By admin | Published: April 29, 2015 09:56 PM2015-04-29T21:56:10+5:302015-04-30T00:31:15+5:30
गडहिंग्लज पंचायत समिती सभा : बाळेश नाईक यांनी सभागृहाचे कामकाज रोखले
गडहिंग्लज : मळी मिश्रित पाणी व सांडपाणी हिरण्यकेशी नदीत सोडून पाणी प्रदूषित करणाऱ्या संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्यावर व गडहिंग्लज नगरपालिकेवर फौजदारी करावी, अशी आग्रही मागणी विरोधी जनता दलाचे सदस्य बाळेश नाईक यांनी बुधवारी केली. याप्रश्नी आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी काही काळ सभागृहाचे कामकाज रोखून धरले.
सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक सभा झाली. पाटबंधारे खात्याच्या आढावावेळी बाटलीतून आणलेले हिरण्यकेशीचे गढूळ पाणी सभापतींच्या टेबलावर ठेवून नाईक यांनी हा प्रश्न लावून धरला.
नदीतील पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर पाटबंधारे खाते काय कारवाई करणार ? याबाबत ठोस उत्तर मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अॅड. हेमंत कोलेकर यांच्यासह उपस्थित सर्व महिला सदस्यांनीही त्यांच्या मागणीला दुजोरा दिला.
सुरूवातीला पाटबंधारे खात्याचे अधिकारी सभेला उपस्थित नव्हते. या खात्याकडून आलेली टिप्पणी सभा कामकाज लिपिक राणे यांनी वाचून दाखवायला सुरूवात केली. त्यास नाईक यांनी जोरदार आक्षेप घेतला. गडहिंग्लज शहरासह पूर्वभागात पाणी प्रदूषणाचा विषय गाजत आहेत. याप्रश्नी आंदोलन सुरू असतानाही पाटबंधारे खात्याला त्याचे गांभीर्य नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहून उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सभापती सुतार व सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे यांनी भ्रमनध्वनीवरून पाटबंधारे शाखा अभियंता नाडकर्णी यांना बोलावून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस गेल्यामुळे या सभेला उपस्थित राहण्यास विलंब झाल्याचा खुलासा करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरच कामकाजाला सुरूवात झाली. नाडकणी यांच्यावरही नाईकांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यावेळी प्रदूषणाच्या प्रश्नावर कारवाईसाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ही स्वतंत्र यंत्रणा असून, कारवाईची बाब खात्याच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, चित्रीच्या लाभक्षेत्रातील निलजी बंधाऱ्यापर्यंत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आले आहे. याच नदीच्या पाण्यावर अनेक गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. नदीचे पाणीच प्रदूषित झाल्यामुळे पूर्वभागातील अनेक खेड्यातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून तेरणीच्या तलावातून पाणी उपसण्यास हलकर्णीसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना परवानगी द्यावी, अशी मागणी नाईकांनी केली. त्यास नाडकर्णी यांनी सहमती दर्शविली.
सभेस सदस्या मीना पाटील, स्नेहल गलगले, सरिता पाटील व रजनी नाईक यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सभेनंतर नांगनूर बंधाऱ्याची संयुक्त पाहणी
हिरण्यकेशी प्रदूषणाच्या प्रश्नावरील चर्चेत नाईक यांनी सभा संपल्यानंतर सभापती व संबंधित अधिकाऱ्यांनी नांगनूर बंधाऱ्याला भेट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सभापती सुतार व सहायक गटविकास अधिकारी जगदाळे, पाटबंधारे शाखाअभियंता नाडकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी, पंचायत अधिकारी माळी यांनी नांगनूर बंधाऱ्याला भेट देऊन त्या परिसरातील हिरण्यकेशीच्या पाण्याची पाहणी केली.