एफआरपी न देणाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Published: December 31, 2014 12:04 AM2014-12-31T00:04:43+5:302014-12-31T00:09:24+5:30

शेकापची मागणी : तासगावमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, रॅली

Criminalize those who do not have FRP | एफआरपी न देणाऱ्यांवर फौजदारी करा

एफआरपी न देणाऱ्यांवर फौजदारी करा

Next

कवठेएकंद : ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे अदा करणे बंधनकारक आहे; परंतु साखर कारखानदारांनी याबाबत टाळाटाळ केली जाते. एफआरपीप्रमाणे ऊसदर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच उसाचा अंतिम दर ३५०० रुपये प्रतिटन मिळावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली. ऊसदरप्रश्नी आज (मंगळवार) तासगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मार्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व शंकरराव माळी, संपतराव पवार, सुभाष पाटील, प्रा. बाबूराव लगारे, शंकरराव थोरबोले, जिल्हा चिटणीस शरद पाटील आदींनी केले. सिध्देश्वर मंदिर चौकातून तहसील कार्यालयावर दुचाकीवरुन घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा काढला.
उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल ऊस गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना मिळावी, शेती पंपांच्या विजेची दरवाढ रद्द करावी, शेतीमालावरील अडत रद्द करावी, शेतकऱ्यांना मासिक २000 रु. पेन्शन मिळावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच उसाला अंतिम दर ३५00 रुपये प्रतिटन मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. शेतीमालाला दर मिळत नाही, वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.
प्रा. बाबूराव लगारे म्हणाले की, कायद्यातील तरतुदीप्रमाणे ऊस गेल्यापासून १४ दिवसांत साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक आहे, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. कायद्याप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी शंकरराव माळी, संपतराव पवार, सूर्यकांत पाटील, शरद पाटील, शंकरराव थोरबोले, वसंतराव तपासे, अशोक घाईल, डॉ. नरेंद्र खाडे, दीपक जाधव यांची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शेखर दळवी यांनी स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवू, अशा आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. (वार्ताहर)

बिलाची मागणी
गतवर्षीच्या ऊस हंगामातील फक्त एकच हप्ता ८०० रु. ने दर देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अशा कारखान्यांबाबत शासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शेकापने पुकारलेल्या धडक मोर्चावेळी शेकापसह राष्ट्रवादी, भाजप, महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

Web Title: Criminalize those who do not have FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.