ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट
By admin | Published: January 2, 2015 10:26 PM2015-01-02T22:26:28+5:302015-01-03T00:02:19+5:30
अवकाळीचा परिणाम : उत्पादन खर्चात वाढ
गणपती कोळी - कुरुंदवाड
ऊस उत्पादक शेतकरी ऊस कारखान्याला घालवण्यासाठी धावपळ करत असतानाच अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण केले आहे. मुळातच उत्पादन व उत्पादन खर्च याचा ताळमेळ घालताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच अवकाळी पावसाच्या हजेरीने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे साखर कारखानदार, ऊसतोड मजूर, वाहतूकदार यांच्यापाठोपाठ निसर्गानेही शेतकऱ्यांची पाठ घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
जानेवारी उजाडला तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांची जुलैमधील ऊसतोड सुरू असल्याने अठरा-अठरा महिने ऊस शेतात ठेवून क्रमपाळीची वाट ऊस उत्पादक शेतकरी पाहत आहे. ऊसतोडीला विलंब होत असल्याने टनेजमध्ये घट होत आहे. अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी आणखीन आर्थिक संकटात सापडत आहे. काळी कसदार जमीन असल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी ट्रॅक्टर अडकतो. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी वाहनधारक अवाजवी पैशाची मागणी करत आहेत.
आर्थिक पिळवणूक
काळी माती, बारमाही पाणी, पोषक वातावरण यामुळे या भागात उसाचीच शेती घेतली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत येथील शेतकरी विक्रमी उसाचे उत्पादनही घेत आहेत. मात्र, उत्पादन खर्च व साखर कारखानदाराकडून मिळणारा दर यामध्ये फारशी तफावत राहत नसल्याने ऊसदरासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लढावे लागत आहे.
त्यातच खुशालीच्या नावाखाली ऊसतोड मजुराकडून व एन्ट्री म्हणून ऊस वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी मुकाट्याने सर्व आर्थिक पिळवणूक सहन करत उत्पादन व उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालत आहे.