जोतिबावर पिण्याच्या पाण्याचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:45+5:302021-07-12T04:16:45+5:30
सतीश पाटील शिरोली : श्री क्षेत्र जोतिबावरील पिण्याच्या पाण्याचे व स्ट्रीट लाईट वीज पुरवठाचे ५६ लाख रुपये थकीत असल्याने ...
सतीश पाटील
शिरोली : श्री क्षेत्र जोतिबावरील पिण्याच्या पाण्याचे व स्ट्रीट लाईट वीज पुरवठाचे ५६ लाख रुपये थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला होता. १५ दिवसांनंतर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला आहे. देवस्थान समितीकडून ३४ लाख रुपये निधी येणे आहे. तो शासनाने दिला तर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होऊ शकतो. वीजबिल भरले नाही तर पुन्हा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटाची टांगती तलवार जोतिबाकरांवर कायम आहे.
जोतिबावर पिण्याचे पाणी हे केर्ली गावातून येते. आठवड्यातून दोन वेळा ग्रामपंचायत पाणीपुरवठा करते. गावात १२०० नळ कनेक्शन आहेत. वर्षाला ७५० रुपये इतकी पाणीपट्टी आकारणी होते. तर प्रत्येक वर्षी महावितरण कंपनीला पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईटची ६० लाख रुपये वीज आकारणी पोटी पैसे भरावे लागतात. या पैशांचे नियोजन ग्रामपंचायतीने ५० लाखांचा भाविकांचा कर वसूल ठेका दिला आहे.त्यातून तसेच १५ वा वित्तायोग ५ लाख, जिल्हा परिषद १ लाख, देवस्थान समिती २ लाख असं प्रत्येक वर्षी नियोजन केलेले असते. पण सन २०२० मध्ये कोरोना या महामारीमुळे संपूर्ण मंदिर लाॅकडाऊन करण्यात आली आहेत. आणि भाविकांना ही प्रवेश नाही. त्यामुळे भाविक कर वसुली बंद आहे.
तसेच स्थानिक लोकांचा रोजगार ही मंदिर सुरू नसल्याने बंद आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे पैसे भागवायला पैसेच नाहीत. अखेर वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला. आणि गावचा पाणीपुरवठा बंद झाला.
यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक लावून वीज वितरण कंपनीला वीजपुरवठा सुरू करून तात्पुरता पाणीपुरवठा दोन दिवसांपासून सुरू झाला आहे. पण महावितरण कंपनीला पैसे भरले नाही तर पुन्हा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
चौकट :-
देवस्थान समितीने प्रत्येक वर्षी वाडी रत्नागिरी जोतिबा रोगरासाठी दोन लाख रुपये निधी देण्याचा आहे.पण सन २००४ पासून गेली १७ वर्षे हा निधी दिलेला नाही. देवस्थान समितीकडून सुमारे ३४ लाख रुपये येणे आहेत.हे पैसे आले तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
प्रतिक्रिया :-
वर्षाला देवस्थान समितीकडून २ लाखांचा निधी जोतिबासाठी देण्याचे आहे.पण गेली १७ वर्षे हा निधी आलेला नाही.याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आह (शिवाजीराव सांगले -उपसरपंच जोतिबा )
गेली दोन वर्षे मंदिर बंद आहे.देवस्थानच्या भक्त करातून सुमारे ५० लाख वर्षाला येतात पण मंदिर बंद असल्याने कर आकारणी बंद आहे.त्यामुळे हा ५० लाखांचा कर आला नाही.(जयसिंग बिडकर-ग्रामविकास अधिकारी)
जोपर्यंत मंदिर उघडून कर वसूल होत नाही तो पर्यंत जोतिबा डोंगरावरील वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित करू नये. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आत्मदहन करणार असा (लखन लादे -ग्रामपंचायत सदस्य,मनसे पन्हाळा तालुका सचिव).