भाजीपाला उत्पादकांसमोर कडक लॉकडाऊनचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:21+5:302021-04-08T04:23:21+5:30
जयसिंगपूर : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधामुळे आणि पुढे जाऊन मोठे लॉकडाऊन होईल, या भीतीने ...
जयसिंगपूर :
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधामुळे आणि पुढे जाऊन मोठे लॉकडाऊन होईल, या भीतीने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या मुंबईकडे जाणारा भाजीपाला सुरळीत जात असला तरी शनिवारी व रविवारी होणाऱ्या विकेंड लॉकडाऊनचा परिणाम देखील भाजीपाला वितरणावर होणार आहे. त्यामुळे मोठ्या बाजारपेठेत पाठवला जाणारा भाजीपाला उत्पादित करण्यापेक्षा स्थानिक बाजारपेठेत जाणारा भाजीपाला उत्पादित करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची बनली आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला आठवडी बाजार बंद राहिले. त्यानंतर मुंबई, अहमदाबादला जाणारा भाजीपाला ठप्प झाला होता. परिणामी, शेतातच भाजीपाला राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यात काकडी, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, दोडका, वांगी व ढोबळी मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतकऱ्यांचा भाजीपाला कोल्हापूर, सांगली, मिरज, इचलकरंजी, कुरुंदवाड याठिकाणी होलसेल दरात भाजी विक्रेते विकत घेतात. तर या स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबईला देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला संघाच्या माध्यमातून पाठविला जातो. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार बंद होत आहेत. त्याचा फारसा परिणाम होत नसला तरी विकेंड लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर मोठे लॉकडाऊन होईल, या भीतीने नवीन पिके घ्यायची की नाहीत की पर्यायी पिकाकडे वळायचे, या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत. किमान स्थानिक बाजारपेठेत जाणारा भाजीपाला पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने देखील मोठ्या बाजारपेठांचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे.
सध्या काकडी, दोडका, वांगी, टोमॅटो यासह भाजीपाला मुंबई बाजारपेठेत सुरळीतपणे जात आहे. शनिवारी व रविवारी होणाऱ्या लॉकडाऊनचा कितपत परिणाम होतो, त्यावरच भाजीपाला वितरणाचे नियोजन समजेल, अशी माहिती भाजीपाला संघ व्यवस्थापनाने दिले.
कोट - महापूर, कोरोना, अतिवृष्टी यामुळे गतवर्षी आर्थिक फटका बसला होता. पुन्हा कडक लॉकडाऊन झाले तर आणखी मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने भाजीपाला वितरणाबाबत उपाययोजना राबवाव्यात.
- उदय आलमाने, शेतकरी दानोळी
फोटो - ०७०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - दानोळी (ता. शिरोळ) येथे शेतकऱ्याने घेतलेले कारल्याचे पीक.