शाहूवाडी तालुक्यातील गुऱ्हाळघरांसमोर ऊस टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:37+5:302021-08-15T04:25:37+5:30

सरूड : वारणा व कडवी नदीच्या महापुराने ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने यंदा शाहूवाडी तालुक्यातील गुऱ्हाळघरांसमोर ...

Crisis of sugarcane shortage in front of cattle houses in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यातील गुऱ्हाळघरांसमोर ऊस टंचाईचे संकट

शाहूवाडी तालुक्यातील गुऱ्हाळघरांसमोर ऊस टंचाईचे संकट

Next

सरूड : वारणा व कडवी नदीच्या महापुराने ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने यंदा शाहूवाडी तालुक्यातील गुऱ्हाळघरांसमोर ऊस टंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. ऊसटंचाईमुळे या नदींच्या पट्टयातील गुऱ्हाळघरांचा हंगाम अडचणीत आला आहे. अगोदरच विविध समस्यांनी अडचणीत आलेली गुऱ्हाळघरे यावर्षी ऊसटंचाईमुळे दुहेरी संकटात सापडली आहेत. परिणामी, या पट्टयातील अनेक गुन्हाळघरे यावर्षी बंद राहण्याची शक्यता आहे.

शाहूवाडी तालुक्याच्या पूर्व भागातील सरूड, वाडीचरण, पाटणे, सावे, वडगाव, वारणा कापशी, शिवारे, भेडसगाव, नेर्ले, तुरुकवाडी, वारणा कोतोली, सोंडोली, वारणा रेठरे या वारणा व कडवी नदीच्या पट्टयात गुऱ्हाळघरांची संख्या जास्त आहे. या भागात उत्पादित झालेल्या गुळाचा दर्जा चांगला असल्याने कोल्हापूर, तसेच कऱ्हाड येथील बाजारपेठेत येथील गुळाचा आजही नावलौकिक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मजूर टंचाईसह उत्पादन खर्चातील वाढ आदी विविध कारणांनी गुऱ्हाळघरे अडचणीत आली आहेत.

गुऱ्हाळघरांच्या या अडचणीमध्ये यावर्षी ऊसटंचाईची भर पडणार आहे. महापुरामुळे वारणा व कडवी नदीकाठच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने या पट्टयातील गुऱ्हाळघरांना गाळपासाठी ऊस आणायचा कोठून ? हा मोठा प्रश्न येथील गुऱ्हाळघर मालकांपुढे उभा राहिला आहे. नदीकाठाशेजारील ऊस पिकाची सध्याची दयनीय अवस्था पाहता अनेक गुऱ्हाळघर चालकांनी यावर्षी गुऱ्हाळघरांची धुराडी न पेटविण्याचा निर्णय घेतला आहे

कोट : वारणा नदीच्या पट्टयातील गुन्हाळघरांचा हंगाम सरासरी तीन ते चार महिने चालतो; परंतु यावर्षी महापुरामुळे ऊस पिके पूर्णपणे वाया गेल्याने उसाअभावी या पट्टयातील गुऱ्हाळघरांचा हंगाम एक महिना चालणेही कठीण आहे. त्यामुळे येत्या हंगामात गुऱ्हाळघराचा डोलारा उभा करणे हे गुऱ्हाळचालकांसाठी आर्थिकदृष्ट्या जोखमीचे काम आहे.

जयवंत बंडू खोत, गुऱ्हाळघर चालक सरुडपैकी खोतवाडी.

Web Title: Crisis of sugarcane shortage in front of cattle houses in Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.