तीन खासगी सावकारांचे गंभीर स्वरूपाचे व्यवहार :छाप्यातील माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 05:25 PM2019-12-13T17:25:09+5:302019-12-13T17:26:29+5:30
सहकार विभागाने विना परवाना खासगी सावकारकी करणाऱ्या १२ सावकारांवर छापे टाकले, तरी त्यातील तिघा सावकारांविरोधातील तक्रारींचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे; त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.
कोल्हापूर : सहकार विभागाने विना परवाना खासगी सावकारकी करणाऱ्या १२ सावकारांवर छापे टाकले, तरी त्यातील तिघा सावकारांविरोधातील तक्रारींचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे; त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.
येथील चेचीराम ऊर्फ किशोर सुर्वे व रूपेश किशोर सुर्वे (रा. टेंबे रोड, शेकाप कार्यालयाजवळ) यांनी एका व्यक्तीला ११ लाख रुपये व्यावसायिक गरजेपोटी दिले आहेत. त्याच्याबदल्यात दमदाटी करून ४५ लाख रुपये वसूल केले आहेत. त्याशिवाय कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प जबरदस्तीने घेतले असल्याचे म्हटले आहे. या सावकारांनी धनादेशावर मोठी रक्कम टाकून तो वटविण्याचाही प्रयत्न केला असल्याचे पुढे आले आहे.
एका सावकाराने ३५ लाख रुपये दिले आहेत. त्याच्याबदल्यात तक्रारदाराचे घर व शिक्षण संस्थेची कागदपत्रेही आपल्याकडे घेतली आहेत. त्याशिवाय कोरे धनादेश घेतले व ते रक्कम लिहून बँकेत भरले असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी भिशीच्या माध्यमातून एकाच व्यक्तीचा तब्बल आठ सावकार छळ करत असल्याचे व त्याची दमदाटी करून गाडी ओढून नेली असून, जमीनही लिहून घेतल्याचे चौकशीत पुढे आले आहे. दोन वेगवेगळ्या सावकारांनी व्याजाच्या रकमेसाठी एकाच्या जमिनीची नोटरी करून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.
- जिल्ह्यात एकूण परवानाधारक खासगी सावकार : २५५
- ५० लाखांहून जास्त उलाढाल असलेले सावकार : ७०
- १० ते १५ लाख उलाढाल असलेले सावकार : १४५
अशी झाली कारवाई
जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व साहाय्यक निबंधकांनी पथकप्रमुख म्हणून ही कारवाई पार पाडली. एकूण १६ पथके होती. त्यामध्ये सहकार विभागाचे ५२ अधिकारी आणि ४८ पोलीस कर्मचारी व पाच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. सकाळी नऊ वाजता ही कारवाई सुरू करण्यात आली.
पर्ल हॉटेलजवळ प्रचंड गर्दी
सकाळी नऊ वाजता कारवाईत सहभागी होणारी सर्व वाहने आणि अधिकारी, कर्मचारी पर्ल हॉटेलशेजारील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर एकत्र आले होते; त्यामुळे तिथे वाहनांची गर्दी झाली. कोल्हापुरात इडी किंवा आयकर विभागाच्या धाडी पडल्याची चर्चा सुरू होती.
आयकर विभागाकडून कारवाई
नारायण जाधव यांच्याकडे सापडलेल्या २७ लाखांच्या रोकडबद्दल त्यांना फारसे काही स्पष्टीकरण देता आले नाही; त्यामुळे या रकमेबद्दल पथकातील अधिकाऱ्यांनी तातडीने आयकर विभागास कळविले. त्यांनी पुणे कार्यालयास याबाबतची माहिती दिली. या रकमेबाबत पुढील कारवाई आयकर विभागच करणार असल्याने ही रक्कम पथकाने ताब्यात घेतली नसल्याचे जिल्हा उपनिबंधक शिंदे यांनी सांगितले.
कुणाकडे काय सापडले..
- नारायण जाधव : २७ लाख रोकड, तीन लाखांचे सोने-चांदीचे दागिने व खरेदी खत
- अभिजित व तुळशीदास जाधव : कोरे ८ धनादेश, ९ बाँड व यश टायर्समध्ये खरेदी खताच्या १७ झेरॉक्स प्रती
- रूपेश व किशोर सुर्वे : १७ कोरे धनादेश व मालमत्ता ताब्यात देत असल्याचे तीन बाँड
- राहुल अवधूत : एक कोरा धनादेश व एक स्टॅम्प
- राधानगरी येथील आनंदा चिबडे यांच्या घरी तब्बल ३० जुन्या सह्या घेतलेले स्टॅम्प आढळले. ते स्वत: स्टॅम्प व्हेंडर आहेत; परंतु जुने स्टॅम्प कुणाचे व कशासाठी घेतले होते, याची चौकशी करण्यात येत आहे.
- मुदाळ (ता. भुदरगड) येथील तानाजी पाटील यांच्याकडे तक्रारदाराची ओढून आणलेली अल्टो गाडी व गाडीची कागदपत्रे सापडली. चिमगांवच्याअरविंद एकल यांच्याकडे सहा खरेदी दस्त व तेवढीच संचकार पत्रे सापडली.
- संजीवकुमार सूर्यवंशी : एक खरेदी दस्त
- विजय नामदेव पाटील : दोन कोरे धनादेश व दोन ट्रेडर्सचे नाव लिहिलेले.
सहकार विभागाबद्दल चांगली प्रतिक्रिया
खासगी सावकारांवर स्वत:हून मोहीम उघडून एकाचवेळी धडाक्यात कारवाई केल्यामुळे खासगी सावकारी करणाºयांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे सहकार विभागाबद्दल जनमानसांतून चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या.
मार्चमध्ये कुरुंदवाडमध्ये कारवाई
यापूर्वी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे असताना त्यांनी कुरुंदवाड येथील १० सावकारांवर असेच छापे टाकले होते. त्यातील सहा सावकार चौकशीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतरची ही गुरुवारची मोठी कारवाई आहे.