दृष्ट भावापासून सावध राहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:37 PM2024-10-10T13:37:17+5:302024-10-10T13:38:56+5:30

हरयाणाची पुनरावृत्ती करायचीय

Criticism of Chief Minister Eknath Shinde opponents on ladki bahin yojana | दृष्ट भावापासून सावध राहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

दृष्ट भावापासून सावध राहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

कोल्हापूर : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे देशभरात कौतुक झाले; परंतु आपल्याच राज्यातील काहीजण ही योजना बंद पाडायला निघाले आहेत, न्यायालयात जाऊ लागले आहेत. तेव्हा अशा दृष्ट भावांपासून सावध राहावे, असे आवाहन करतानाच कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही, उलट आम्हाला साथ दिली तर दीड हजारांऐवजी तीन हजार रुपये खात्यात टाकले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री दसरा चौक येथे झालेल्या सभेत दिली.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू होत असलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ, तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार अमल महाडिक, दूध संघाचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, सुजित चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी अंबाबाई देवीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून, दोन वर्षांत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचेच आहेत. या सरकारमधील सी.एम. हा कॉमन मॅन आहे. मी देणारा मुख्यमंत्री आहे. यापूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते. आम्ही पाच हप्ते भगिनींच्या खात्यावर टाकले आहेत. हप्ते घेणाऱ्यापैकी मी नाही. फेसबुकवर काम करणारा नाही तर फेस टू फेस काम करणारा आहे, अशा शब्दात अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी टीका केली.

हरयाणाची पुनरावृत्ती करायचीय

हरयाणाची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात करायची आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, मागच्या पन्नास वर्षात सरकारने दिले नाही ते आम्ही मागच्या दोन वर्षात दिले आहे. कायदा जनतेच्या भल्यासाठी वापरला. आता आम्हाला राज्यातील बहिणी लखपती झाल्याचे पाहायचे आहे.

खंडपीठाबाबत मुख्य न्यायाधीशांशी चर्चा

कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे ही मागणी आहे. मी राज्याचे मुख्य न्यायाधीशांशी माझी चर्चा झाली आहे, एवढेच शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Criticism of Chief Minister Eknath Shinde opponents on ladki bahin yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.